प्रदीप कुरुलकरच्या सेवानिवृत्तीला उरले होते फक्त पाच महिने | पुढारी

प्रदीप कुरुलकरच्या सेवानिवृत्तीला उरले होते फक्त पाच महिने

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डीआरडीओचा शास्त्रज्ञ व संचालक प्रदीप मोरेश्वर कुरुलकरच्या सेवानिवृत्तीला पाच महिने उरलेले असताना त्याच्या हेरगिरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या यंत्रणेलाही या सर्व कृत्यांनी आश्चर्यचकित केले आहे. तपास अधिकारी कुरुलकरचा लॅपटॉप व मोबाईलचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. त्यात त्याचे विदेशातील काही फोटो सापडले असून, ते कोणत्या देशातील आहेत, याचा तपास करण्यात येत आहे.

त्याच्या मोबाईलमधील फोन नंबर डायरी तपासली असता, काही कॉल अलीकडच्या काळात ब्लॉक केले असल्याचे आढळले आहे. कॉल ब्लॉक करण्यापूर्वी एका विशिष्ट नंबरवरून खूप वेळा कॉल येऊन गेले असल्याचे समोर आले आहे. यात काही व्हिडिओ कॉलचाही समावेश आहे. हा नंबर नेमका कुणाचा आहे, हे शोधले जात आहे. ते कॉल त्या पाकिस्तानी तरुणीचेच असावेत, असा तपास यंत्रणेला संशय आहे.

सोमवारपर्यंत मागितली कोठडी

एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे की, कुरुलकरने केलेल्या सर्व हालचाली व सर्व कृत्ये अत्यंत संवेदनशील असून, सनसनाटी प्रकारचा डेटा शेअर केला आहे. हे कृत्य देशविघातक असल्यानेच 15 मेपर्यंत त्याला पोलिस कोठडी मागितली आहे.

Back to top button