पुणे विभागात ‘पीडब्ल्यूडी’ची 313 पदे भरण्यासाठी प्रस्ताव | पुढारी

पुणे विभागात ‘पीडब्ल्यूडी’ची 313 पदे भरण्यासाठी प्रस्ताव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागांतर्गत 124 आणि 189 अशी एकूण तब्बल 313 पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याबाबत राज्यशासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून विविध पदांची भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत.

त्यामुळे कामांवर परिणाम होत आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळणार्‍या अधिकार्‍यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कनिष्ठ अभियंता हा विभागाचा कणा असतो. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकार्‍यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून, लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

रस्त्यांची कामे दोन महिन्यात
पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. पुणे विभागातील 24 हजार 107 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जिओ फेसिंग करण्यात येणार आहे, त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही भागात खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाणार आहे.

पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदाची 124, तर स्थापत्य अभियंत्यांची 189 पदे रिक्त आहेत. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.’
– अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम पुणे

Back to top button