मुख्यमंत्र्यांचे डीएसकेप्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश | पुढारी

मुख्यमंत्र्यांचे डीएसकेप्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत म्हणून ठेवीदारांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. प्रकरणाची सध्याची स्थिती काय आहे, त्यात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचा ’डीएसके ड्रीम सिटी’ प्रकल्प विकसित करण्यासाठी म्हाडाला देण्यात यावा. ड्रीम सिटीची 300 एकर जमीन म्हाडाने ताब्यात घेऊन ती विकसित करावी. म्हाडाने जागा विकसित केली, तर 2.5 एफएसआय मिळू शकतो. त्यामुळे या मालमत्तेची किंमत 6 हजार कोटी रुपयांपर्यंत पोचते.

त्यातून बँक आणि ठेवीदारांचे पैसे देता येऊ शकतात. सरकारला त्यातून 3 हजार कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असा तडजोड अर्ज ठेवीदारांच्या वतीने अ‍ॅड. चंद्रकांत बिडकर यांच्यामार्फत करण्यात आला होता. मात्र, ठेवीदारांनी केलेल्या मागण्या कायद्यानुसार टिकाव धरणार्‍या नाहीत तसेच त्याप्रमाणे शासकीय अधिकार्‍यांना आदेश करता येणार नाही, असे नमूद करीत प्रकल्प विकसित करण्यासाठी म्हाडाला देण्याचा ठेवीदारांनी केलेला तडजोड अर्ज फेटाळण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालून डीएसके यांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी तरतूद करण्याची विनंती अ‍ॅड. बिडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना केल्या होत्या, अशी माहिती अ‍ॅड. बिडकर यांनी दिली.

Back to top button