संजय राऊत जूनमध्ये राष्ट्रवादीत जाणार : नितेश राणे | पुढारी

संजय राऊत जूनमध्ये राष्ट्रवादीत जाणार : नितेश राणे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे येत्या १० जूनपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी केला. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या बैठकाही सुरू आहेत, असेही राणे म्हणाले.

आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. येत्या दोन ते तीन आठवड्यांत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे. १० जून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा त्याच्या आधीच संजय राऊत हे राष्ट्रवादीत जातील. त्यासाठी बैठकाही सुरू आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची भूमिका काय होती, ते पाहा. राऊत हे त्यावेळी सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलत होते. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर राऊतांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी सुरू असल्याचेही राणे म्हणाले.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही. ते पुन्हा आपल्याला खासदार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यात रस नाही, मला राष्ट्रवादीत घ्या, असा प्रस्ताव राऊत यांनी मांडला होता.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासोबत सिल्व्हर ओकवर जाणार होते. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. यामागे नेमके काय षड्यंत्र आहे. संजय राऊत हे ठाकरेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का, असे प्रश्नही राणे यांनी उपस्थित केले.

Back to top button