खरंच 11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार येणार? काय आहे कायदे तज्ज्ञांचा तर्क | पुढारी

खरंच 11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार येणार? काय आहे कायदे तज्ज्ञांचा तर्क

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत राजकीय विश्लेषक अनेक अंदाज वर्तवत आहेत. हे सर्व घडत असतानाच कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी हे 10 मेच्या आधी नक्की होतील, असा दावा त्यांनी केला आहे. या बरोबरच राज्यात नवीन सरकार स्थापनेबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असं असीम सरोदे आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिबाबत पुढारी ऑनलाईनशी बोलताना कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले की, घटनापीठातील एक सदस्य असलेले न्यायमूर्ती एम. आर. शहा हे 15 मेला निवृत्त होत आहेत. तसेच 13 आणि 14 मे रोजी शनिवार आणि रविवार असल्याने सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी आहे. त्यामुळे 10 तारखेला कर्नाटकचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देऊ शकते. हा निकाल सध्याच्या शिंदे सरकार विरोधात जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांना आर्टिकल 142 च्या अधिकारानुसार थेट अपात्र करू शकतात. तसे न झाल्यास ते विधानसभेच्या अध्यक्षांना एका विशिष्ट मुदतीत निकाल द्यायला सांगतील. असं झालं तर हे सरकार आणखी दोन महिने राहू शकते, असं असीम सरोदे म्हणाले.

पुढे बोलताना सरोदे म्हणाले, राज्यात सरकार बनवण्यासाठी सर्वात जास्त तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार हे अध्यक्ष पदावरून बाजूला झाले आहेत. कारण शरद पवार यांना आपली धर्मनिरपेक्ष इमेज कायम ठेवायची आहे. उद्या जर राष्ट्रवादी भाजपबरोबर गेली तर ते म्हणू शकतील की, मी आता पक्षाचा अध्यक्ष नाही. हा निर्णय नव्या अध्यक्षांनी घेतलेला आहे. तसेच न्यायालयाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादीतील नवीन अध्यक्षासह पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. राष्ट्रवादी केंद्र सरकारमध्ये देखील सहभागी होऊ शकते, असं देखील सरोदे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय घडतं? हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Back to top button