बालविवाह रोखणार कोण ? प्रसूतीसाठी मुलगी रुग्णालयात गेल्यानंतर फुटते वाचा | पुढारी

बालविवाह रोखणार कोण ? प्रसूतीसाठी मुलगी रुग्णालयात गेल्यानंतर फुटते वाचा

संतोष शिंदे : 

पिंपरी : मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचे लग्न कमी वयात लावून दिल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. कोणीही तक्रार करीत नसल्याने बालविवाह रोखणार्‍या समित्या, सामाजिक संस्था आणि पोलिस या यंत्रणा अशा प्रकरांपासून अनभिज्ञ आहेत. विशेषतः आळंदी परिसरात बालविवाहांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विनातक्रार होत असलेले बालविवाह रोखणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आळंदी येथे बालविवाहाचे काही प्रकार उघडकीस आले आहेत; मात्र यातील बहुतांश प्रकरणात मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्न होत नसल्याचे अधोरेखित होत आहे.

पालकांनाही होईल तुरुंगवास
बालविवाह रोखणे आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी आणखी सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. बालविवाह होत असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला माहिती द्यावी. पालक आपल्या पाल्यावर विवाहासाठी जबरदस्ती
करीत असल्यास त्यांनाही दंड आकारून तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

अल्पवयीन मुलीशी विवाह करून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीत दिघी येथे ही घटना घडली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मंगल जोगन यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाह ही समाजातील एक अनिष्ट प्रथा आहे. ही प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीदेखील सजग राहणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला किंवा समाजात कोठेही बालविवाह होताना आढळल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.

                                                               – प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस

 

‘पोक्सो’अंतर्गत होते कारवाई
देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मध्ये करण्यात आला असून 9 नोव्हेंबर 2007 पासून तो अंमलात आला. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10, 11 पोक्सो 4, 5(ज)(2),6, 8, 12 अन्वये कारवाई केली जाते. ’पोक्सो’ हे बाललैंगिक अत्याचारासंदर्भात वापरले जाणारे गंभीर कलम आहे.

तीन वर्षे कारावासाची तरतूद
बालविवाह लावणार्‍यास दोन वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड, तसेच लग्न करणार्‍यास तीन वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वर व वधू यांचे आर्डवडील, नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी बालविवाहास प्रत्यक्षात मदत केली, अशा विवाहात सामील झाले, त्या सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.

येथे करा तक्रार
बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सजगता दाखवणे गरजेचे आहे. स्थानिक पोलिसांना विवाहाची माहिती द्यावी. तसेच, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर कळवावे. हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतरही स्थानिक पोलिसांनाच याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी जाऊन कार्यवाही करतात.

Back to top button