कोल्हापूर बाजार समितीसाठी चुरशीने 95 टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर बाजार समितीसाठी चुरशीने 95 टक्के मतदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीने 94.99 टक्के मतदान झाले. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील साडेसहा तालुक्यांतील 70 केंद्रांवर सेवा संस्था व ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात प्रचंड ईर्ष्येने मतदान झाले. रविवारी (दि. 30) रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

बाजार समितीच्या 18 संचालकांच्या जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. सेवा संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार अशा चार गटांत मतदान झाले. सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीमध्ये दुरंगी लढत होत आहे. 21 हजार 898 मतदारांपैकी 20 हजार 280 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रांच्या बाहेरील दोन्ही आघाडीच्या बूथवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मतदारांना आणण्यासाठी वाहनांचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी मतदानासाठी गर्दी होती. त्यामुळे केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक होती.

शहरात जाधववाडी केंद्रावर संस्था व ग्रामपंचायतीसाठी मतदान ठेवण्यात आले होते. बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे संचालक मतदार आहेत.

दुबार 197 मताचा अधिकार नाकारला

व्यापारी गटात 75.27 टक्के तर हमाल गटात 92.26 टक्के मतदान झाले. प्राधिकरणाच्या निर्णयानुसार व्यापारी गटातील दुबार 197 मतदारांना मतदान करता आले नाही. त्यामुळे या मतांचा झटका कोणाला बसणार याची व्यापारी वर्गातून उत्सुकता लागून राहिली आहे. या गटातून 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार या दोन मतदारसंघासाठी जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत मतदान घेण्यात आले. या दोन्ही गटांत प्रचाराच्या दरम्यान साम, दाम, दंड अवलंबण्यात आल्याची चर्चा होती. अडते- व्यापारी गटात 1 हजार 217 मतदारांपैकी 916 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सहकारी निवडणूक प्राधिकरणाने व्यापारी गटात दुबार मतदार नोंदणी असणार्‍यास एकच मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे या गटातून 197 मतदारांना मतदान करण्यास रोखण्यात आले.
जाधववाडी मतदान केंद्राला आ. हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, युवराज पाटील, भैया माने यांनी दुपारी भेट दिली.

हमाल गटात 92.26 टक्के मतदान

हमाल-तोलाईदार गटात 92.26 टक्के मतदान झाले. या गटात 7 उमेदवार रिंगणात आहेत. 894 पैकी 874 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गतवेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे निकालाकडे हमाल कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्या मतमोजणी

रविवारी (दि. 30) रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. अडते, व्यापारी गटातील निकाल सर्वप्रथम लागण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक मतदान

राधानगरी तालुक्यातील तारळे केंद्रावर ग्रामपंचायत गटात 100 टक्के मतदान झाले. या केंद्रावर 279 पैकी 279 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गगनबावडा केंद्रावर सेवा सोसायटी गटात सर्वात कमी 74.24 टक्के मतदान झाले.

Back to top button