Singapore | सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीला फासावर लटकवले, गांजा तस्करी प्रकरणी दिलेल्या शिक्षेचा जगभरातून निषेध | पुढारी

Singapore | सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीला फासावर लटकवले, गांजा तस्करी प्रकरणी दिलेल्या शिक्षेचा जगभरातून निषेध

पुढारी ऑनलाईन : सिंगापूरमध्ये (Singapore) बुधवारी ४६ वर्षीय भारतीय वंशाच्या तंगराजू सुपैया याला १ किलो गांजा तस्करी प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याचे कुटुंब, मानवाधिकार कार्यकर्ते आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषद यांच्या दया याचिकेची दखल न घेता ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या ११व्या तासांचे अपील येथील न्यायालयाने फेटाळल्यानंतर एका दिवसानंतर लगेच तंगराजू सुपैया याला चांगी तुरुंगात पहाटेच्या वेळी फाशी देण्यात आली. त्याला २०१३ मध्ये दोन व्यक्तींच्या समन्वयाने १ किलो गांजा आयात केल्याप्रकरणात २०१८ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. गंभीर बाब म्हणजे त्याने कधीही अमली पदार्थ हाताळले नव्हते. तरीही त्याचा संबंध अमलीपदार्थ तस्करांशी असल्याचा निर्णय दिल्यानंतर त्याला न्यायमूर्तींनी फाशीची शिक्षा सुनावली.

सिंगापूरमधील अमली पदार्थ विक्री आणि तस्करीशी संबंधित कायदे जगातील सर्वात कठोर आहेत आणि अमली पदार्थ तस्करीच्या काही गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अनिवार्य आहे. गेल्या वर्षी या देशाने अमली पदार्थ गुन्ह्यांसाठी ११ लोकांना फाशी दिली होती. तंगराजूला दिलेली फाशीची शिक्षा ही सिंगापूरमधील सहा महिन्यांतील पहिली आहे.

सिंगापूरच्या (Singapore) या कारवाईचा मानवाधिक कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. ह्युमन राइट्स वॉचचे आशियातील उपसंचालक फिल रॉबर्टसन यांनी, ही शिक्षा अत्यंत क्रूर आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तंगराजू विरुद्धचे पुरावे परिस्थितीजन्य होते, असेही त्यांनी नमूद केले आहे. मानवाधिकार संघटनांनीदेखील चिंता व्यक्त करत म्हटले आहे की जेव्हा तंगराजू याची पहिल्यांदा अधिकार्‍यांनी चौकशी केली तेव्हा त्याला वकीलही दिला नाही. सिंगापूरचा कायदादेखील अशा कोणत्याही अधिकाराची हमी देत ​​नाही. पोलिसांनी जेव्हा त्याचा जबाब घेतला तेव्हा त्याला तामिळ भाषांतरकार दिला नव्हता.

त्याला फाशी देण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ मानवाधिकार अधिकार्‍यांनी सिंगापूर सरकारला शिक्षेवर तात्काळ पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. “आम्हाला योग्य कार्यवाही आणि निष्पक्ष ट्रायलविषयी चिंता आहे,” असे UN मधील मानवाधिकार उच्चायुक्तांच्या प्रवक्त्या रविना शामदासानी यांनी म्हटले होते. पण सिंगापूरच्या सरकारी यंत्रणेने या सर्व बाबी फेटाळून लावल्या.

या खटल्याशी संबंधित इतर दोन व्यक्तींनी तंगराजूविरुद्ध पुरावे दिले. त्यांच्यापैकी एकाला गांजा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने ४९९.९ ग्रॅम अमली पदार्थाची तस्करी केल्याची कबुली दिली होती. त्याच्याकडे सापडलेला अमली पदार्थ ५०० ग्रॅम पेक्षा कमी असल्याने त्याला फाशीच्या शिक्षेतून वगळण्यात आले. त्याला २३ वर्षे तुरुंगवास आणि छडीचे १५ फटके सुनावण्यात आले. तर दुसऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

तंगराजूच्या कुटुंबियानी त्याची फाशीची शिक्षा मागे घ्यावी म्हणून मोहीम चालवली होती. त्यासाठी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली होती. तसेच सिंगापूरचे अध्यक्ष हलीमह याकोब यांना पत्रेही लिहिली होती. गेल्या मंगळवारी न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्यासाठी तंगराजूच्या कुटुंबियानी केलेली दया याचिकाही फेटाळून लावली होती. १५ पानांच्या निकालात न्यायमूर्ती चोंग यांनी स्पष्ट केले की तंगराजू त्याच्यावरील खटल्यावर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाला कायदेशीर पुरावा देऊ शकला नाही.

हे ही वाचा :

Back to top button