Koo laysoffs | Twitter चा प्रतिस्पर्धी Koo कडून नोकरकपात, ३० टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ | पुढारी

Koo laysoffs | Twitter चा प्रतिस्पर्धी Koo कडून नोकरकपात, ३० टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

पुढारी ऑनलाईन : Twitter चा प्रतिस्पर्धी असलेल्या Koo ने आर्थिक कारण देत ३० टक्के कर्मऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ट्विटरचा भारतीय प्रतिस्पर्धी म्हणून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo पुढे आले होते. पण Koo ने अलिकडील काही महिन्यांत त्यांच्या जवळपास एक तृतीयांश कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. कारण कंपनी तोट्यात आली असून ती निधी उभारण्यास असमर्थ ठरली असल्याचे समजते. (Koo laysoffs)

तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या मायक्रोब्लॉगिंग अॅपने त्यांच्या सुमारे २६० कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे. ”सध्या जागतिक भावना ही वाढीपेक्षा कार्यक्षमतेवर अधिक केंद्रित आहे आणि व्यवसायांनी युनिट अर्थशास्त्र सिद्ध करण्याच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.,” असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले असल्याचे वृत्त ब्लूमबर्ग न्यूजने दिले आहे.

सुरुवातीला बंगळूर येथे असलेल्या या कंपनीला ट्विटरवरील कंटेंटवरून केंद्र सरकारशी झालेल्या वादाचा फायदा झाला होता. कारण सरकारी अधिकारी, क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक नागरिक ट्विटरला स्थानिक पर्याय म्हणून कू कडे वळले होते. सध्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या महसुलात घट झाली आहे. यामुळे त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांच्या मुल्यांकनात अब्जावधीची घट झाली आहे. परिणामी अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे.

कू कडे ६ कोटीहून अधिक डाउनलोडसह चांगले भांडवल आहे आणि फायद्यात येण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु असल्याचे Koo चे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. सध्या इतर सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मच्या तुलनेत Koo चा प्रति यूजर्स महसूल सर्वांधिक असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

रिसर्च फर्म Tracxn च्या म्हणण्यानुसार, आपल्या गुंतवणूकदारांमध्ये Accel आणि Kalaari Capital ची गणना करणाऱ्या Koo ने गेल्या वर्षी २७३ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला होता. Koo ने नोकरीवरुन काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना भरपाई पॅकेज, आरोग्याशी संबंधित लाभ आणि नवीन नोकऱ्या शोधण्यात मदत केली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. (Koo laysoffs)

हे ही वाचा :

Back to top button