आशीष देशमुखांचे काँग्रेसमधून निलंबन | पुढारी

आशीष देशमुखांचे काँग्रेसमधून निलंबन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या नेतृत्वावर सातत्याने टीका करणारे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यावर अखेर पक्षाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतल्याची देखील चर्चा सुरू आहे. याबाबत आशिष देशमुख भूमिका स्पष्ट करणार आहेत. पक्षाने त्यांना ५ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात स्पष्टीकरण मागविले होते.

देशमुख यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. मोदी आडनावावरून न्यायालयाने शिक्षा केल्यावर राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याचवेळी आशीष देशमुख हे फार काळ काँग्रेसमध्ये टिकणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे संकेत मिळत आहेत. हिंगणा मतदारसंघावर त्यांचा डोळा असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या शिस्तभंग कारवाई समितीने त्यांना ५ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. या नोटीसीत समितीने देशमुख यांनी राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. सातत्याने पक्ष नेतृत्वावर टीका केल्याबद्धल पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, याचे तीन दिवसात उत्तर देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. मुळचे काँग्रेस विचारांचे असलेल्या देशमुखांनी काही वर्षांपूर्वी भाजपशी घरठाव केला होता. भाजपच्या वतीने ते काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले होते. मात्र, नेत्यांशी बिनसल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. आता काँग्रेसपासूनही त्यांनी फारकत घेतल्यास राष्ट्रवादीचा पर्याय उरतो.

Back to top button