कविता चोरीला गेली; ठाणे पोलिसांकडून दखल | पुढारी

कविता चोरीला गेली; ठाणे पोलिसांकडून दखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक महिलांनी बेदम मारहाण केल्यानंतरही रोशनी शिंदे यांची तक्रार नोंदवून घेण्यास तयार नसलेले ठाणे पोलीस सध्या एका कविता चोराच्या शोधात आहेत. माझी कविता चोरीला गेली म्हणून सांगत एका कवयित्रीने राबोडी पोलीस ठाणे गाठले आणि पोलीसही आता या कविता चोरीचा तपास कोणत्या कायद्यात बसतो याचा अभ्यास करू लागले आहेत.

प्राजक्ता गोखले यांनी आपल्या फेसबुकवरील दोन कविता चोरीला गेल्याची तक्रार ठाण्याच्या राबोडी पोलिस ठाण्यात दाखल केली. समाजमाध्यमावर व्यक्त होणारे अनेकजण मजकूरात मूळ लेखकाचे नाव गाळून तो मजकूर स्वतःच्या नावावर खपवतात, हे प्रकार सर्रास घडतात, त्या विरोधात चर्चाही घडतात, मात्र कुणी त्यावर कायद्याच्या कक्षेत आक्षेप नोंदवतांना दिसत नाही, मात्र प्राजक्ता गोखले यांनी ही सुरुवात केली. त्यांनी चोरही शोधून काढला. माझ्या फेसबुक पानावर प्रकाशित २ कविता अमित लहाने याने प्रेमवेडा या नावाने त्याच्या स्वतःच्या फेसबुक पानावर स्वतःच्याच नावाने प्रकाशित केल्या, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गोखले यांनी केलेली ही तक्रार सध्या समाजमाध्यमावर फिरते आहे, अनेकांनी गोखले यांच्या या तक्रारीचे समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. वाड्मय चौर्याच्या या प्रकाराविरोधात आवाज उठवल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

गोखले यांनी आमच्या पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा तपास सुरू आहे. ही तक्रार कायद्याच्या कक्षेत बसते की नाही, हेही पहावे लागेल.
– संतोष घाटेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राबोडी पोलीस ठाणे

साहित्य किंवा कवितेची चोरीचे प्रकार घडले तरी कुणी तक्रारीसाठी पुढे येत नाही या कवयित्रीने पोलिसात तक्रार केली तर समाजमाध्यमावर त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवत आहेत, त्यांना ट्रोल करत आहेत, कवी, साहित्यिकांनी अशावेळी एकमेकांमधील असूया बाजूला ठेवून साथ द्यायला हवी.
– जर्नादन म्हात्रे, गजलकार

Back to top button