वेल्हे : खानापूर ते रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले | पुढारी

वेल्हे : खानापूर ते रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही गेल्या 5 वर्षांपासून खानापूर ते रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळा तोंडावर आला असून खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहने दरीत कोसळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक भगवान पासलकर यांनी दिला आहे.

खानापूर ते रांजणे-पाबे घाट रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरणासाठी खडीचे ढिगारे टाकले आहेत. सर्वात गंभीर स्थिती घाटाच्या माथ्यावर आहे. डोंगरातील तीव्र चढ कमी करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी माती, मुरूम तसेच खडक उघडे पडले आहेत, त्यामुळे वाहने घसरत आहेत. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

सार्वजिनक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे खानापूर, मणेरवाडी येथील हॉटेल तिरंगा ते थोपटेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट आहे. सुरुवातीला वन विभागाने हरकत घेतल्याने व आता नियोजनाच्या अभावी खानापूर ते थोपटेवाडी हा अवघ्या 4 किलोमीटर अंतराचा रस्ता 5 वर्षे होऊनही अर्धवट आहे, याकडे स्थानिक मावळा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दारवटकर व नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, असे पासलकर यांनी सांगितले.

ठेकेदाराला घाटाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना
पावसाळ्यापूर्वी रखडलेल्या घाट रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यानुसार खानापूर ते थोपटेवाडीपर्यंतचे डांबरीकरणाचे काम येत्या दोन-तीन आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तर रांजणे-पाबे घाट रस्त्याचा तीव— चढ कमी करण्यासाठी काही दिवस वाहतूक बंद ठेवण्याबाबत पोलिस, महसूल विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

Back to top button