निधी वाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद नाहीत: राजेश क्षीरसागर | पुढारी

निधी वाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद नाहीत: राजेश क्षीरसागर

सांगली: पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीबाबत ‘कोणी काहीही बोलेल, पण कोणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील’, असा खुलासा करत नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष व शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. तसेच आगामी सर्व निवडणूका दोन्ही पक्ष एकत्र लढविणार असून निधी वाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये कोणतेही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले .

राजेश क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत कोणी जागा लढवायच्या याबाबत अनेकजण वक्तव्ये करीत आहेत. परंतु याबाबत अजून निर्णय अजून होणार आहे. तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार आहेत. त्यानंतर जागा वाटप होईल. आता कोणी काहीही बोलेल, त्याला काही अर्थ नाही.

क्षीरसागर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांची मोट बांधण्याची जबाबदारी दिली आहे. राज्यात नियोजन मंडळाच्या निधी वाटपाबाबत काही तक्रार आल्या आहेत. परंतु शिवसेना-भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत. नियोजन मंडळचा निधी वायफळ खर्च होवून याची दक्षता आम्ही घेत आहोत. तसेच तो नियमाप्रमाणे खर्च होणे गरजेचे आहे. आम्ही सर्वजण मनाने एकत्र आहोत. दोन्ही पक्षात निधी वाटपाबाबत कोणतेही मदतभेत नाहीत.

ते पुढे म्हणाले, सध्या सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना नदी प्रदूषणाचा मोठ्या प्रमणात फटका बसत आहे. इचलकरंजी परिसरात काही जणांना कॅन्सरचा देखील धोका निर्माण झाला आहे. नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 600 कोटी रुपयांचा डीपीआर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील देखील नदी प्रदूषण कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

क्षीरसागर म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह शिष्टमंडळाची बैठक झाली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथे परिषद देखील झाली आहे. त्यामुळे आता बेळगाव सीमाप्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे.

‘ज्याची सत्ता त्याला निधी वापरण्याचा अधिकार’

क्षीरसागर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निधी मिळत नसल्याची वारंवार ओरड करण्यात येते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी कधी आम्हाला निधी दिला? सत्ता असणार्‍यांकडून निधीचा वापर केला जात असल्याचे सांगून त्यांनी ‘ज्याची सत्ता त्यालाच निधी वापरण्याचा अधिकार’ असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार

आताच नाहीतर पुढील पाच वर्षे देखील एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी सांगलीत केले. त्यामुळे पुढील निवडणुकीत देखील भाजपला शिवसेनेलाच पाठिंबा द्यावा लागणार, असे संकेत क्षीरसागर यांनी दिले.

एकनाथ शिंदे राजकीय गुरू

एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. ते आमचे राजकीय गुरू आहेत. केवळ भाषणे देवून पक्ष वाढत नाही. जनतेचा विकास गेला पाहीजे. मला मंत्रीपद द्यावे हे जनतेला कळत होते. परंतु इतक्या वर्षात ‘त्यांना’ कळले नाही, असा टोला क्षीरसागर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

हेही वाचा 

Back to top button