पुणे : 350 कोटींच्या भूखंडासाठी म्हाडाची ‘फिल्डिंग’ | पुढारी

 पुणे : 350 कोटींच्या भूखंडासाठी म्हाडाची ‘फिल्डिंग’

दिगंबर दराडे : 

 पुणे : पुणे गृहनिर्माण विकास प्राधिकरणाने धानोरी येथील सहाराची तब्बल 107 एकर जमीन 350 कोटी रुपयांना घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेकरिता पाठविला आहे. यामुळे म्हाडाला हक्काची जागा उपलब्ध होणार असून, या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत. शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार ही जागा विकत घेण्यासाठी म्हाडाने तयारी दर्शविली आहे. सहाराने देखील आपल्यावरील पिरामल फायनान्सचे कर्ज फेडण्यासाठी हा एका जागेवरील प्लॉट विकण्याचे मान्य केले आहे.

ही जागा विकत घेण्याकरिता गृहनिर्माणच्या प्राधिकरणाने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. या जागेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पुढील तीस वर्षे म्हाडाला जागेचा प्रश्न पडणार नसल्याची माहिती दै. ‘पुढारी’शी बोलताना म्हाडाचे पुणे विभागाचे सीईओ नितीन माने पाटील यांनी दिली.

पुणे विभागामध्ये म्हाडाकडे 622 हेक्टर जमीन होती. त्यापैकी आतापर्यंत 596 हेक्टर जमिनीचा गृहबांधणीकरिता वापर करण्यात
आलेला आहे. यामुळे केवळ 28 ते 30 हेक्टर जमीन म्हाडाकडे शिल्लक राहिलेली आहे. या जमिनीवर अनेक प्रकारचे लिटिगेशन आहे. यामुळे याचा म्हाडाला वापर करणे कठीण होऊन बसलेले आहे. यामुळे त्यांनी सहाराचा 107 एकरचा प्लॉट घेण्याची तयारी दर्शविलेली आहे. शहराभोवती ही जागा मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर देखील शहराभोवती मिळण्यास फायदा होणार आहे.

या जागेवर बड्या बिल्डरांचा डोळा
शहरातील बड्या बिल्डरांचा या जागेवर डोळा असल्याचे वास्तव समोर आले आहे. हे बिल्डर दहा-पंधरा एकराचे तुकडे करून जागा मागत असल्याने सहाराने त्यांना नकार दिला आहे. ही जागा म्हाडाने विकत घेतल्यास एकरकमी पैसे सहाराला मिळणार असल्याने त्यांनी म्हाडाला हिरवा कंदील दाखविला आहे.

Back to top button