गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..! | पुढारी

गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्साह, आनंद अन् नवलाई घेऊन यंदाचा गुढीपाडवा बुधवारी (दि. 22) जल्लोषात साजरा होणार आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी विशेष तयारी करण्यात आली असून, घरी गुढी उभारून मांगल्याची, भरभराटीची अन् समृद्धीची कामना करण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. घरोघरी सूर्योदयानंतर पारंपरिक वेशभूषेत कुटुंबीयांसमवेत गुढी उभारण्यात येणार आहे. घरोघरी पंचपक्वान्नांचाही बेत आखला जाणार आहे.

सपूंर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या पाडव्यालाही नवचैतन्याची गुढी सगळीकडे उभारली जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन संकल्पनांची आणि कार्याची सुरुवात करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेत घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. तर नवीन कार्याची सुरुवात या दिवशी करण्यात येणार आहे. तसेच, नवीन दागिने, नवीन वाहन आणि नवीन घर खरेदीचा मुहूर्तही साधण्यात येणार असून, अनेकांनी त्यासाठी बुकिंग केले आहे.

त्यामुळेच गुढीपाडव्याच्या साहित्यांच्या खरेदीसाठी मंगळवारी (दि. 21) बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली. रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग यासह विविध ठिकाणी साखरेच्या गाठी आणि तयार लहान गुढींच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. खासकरून गुढीसाठी लागणार्‍या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीवरही अनेकांनी भर दिला.

सांस्कृतिक गुढीपूजन बुधवारी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक गुढीपूजन आयोजित केले आहे. अभिनेता क्षितिज दाते व ऋचा आपटे यांच्या हस्ते गुढीपूजन होणार आहे. बुधवारी (दि. 22) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी दहा वाजता पूजन होईल. सुनील महाजन, समीर हम्पी, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते आदींनी संयोजन केले आहे.

Back to top button