चिपळूण : वाशिष्ठीमधील गाळ उपशाची जलसंपदाकडून पाहणी | पुढारी

चिपळूण : वाशिष्ठीमधील गाळ उपशाची जलसंपदाकडून पाहणी

चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणातील वाशिष्ठी नदी गाळमुक्त करण्यासाठी सुरू झालेल्या नाम फाऊंडेशनच्या गाळ उपसा कामाची नुकतीच जलसंपदा विभागाचे अधिकारी जगदीश पाटील यांनी पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत 50 हजार घ.मी. इतका गाळ नदीपात्राबाहेर काढण्यात आला.

शासनाच्या आदेशानुसार नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीपात्रातील पहिल्या टप्प्यातील शिल्लक असलेला गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कामात 2 लाख घ.मी. इतका गाळ काढून ठेवण्यात आला आहे. हा गाळ अन्य ठिकाणी टाकण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सुरू असलेल्या कामाची पाहणी नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर तसेच प्रांताधिकारी प्रवीण पवार, फाऊंडेशनचे गणेश थोरात यांच्यासह जलसंपदा विभागाचे जगदीश पाटील, विपुल खोत, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केली.

पात्राबाहेर काढलेला गाळ अन्यत्र टाकण्यासाठी चर्चा झाली. यावेळी समन्वयक समीर जानवलकर, महेंद्र कासेकर, दिगंबर चितळे, धनश्री जोशी, रूही खेडेकर, गुलमहंमद शाह आदी उपस्थित होते. पावसापूर्वी नदीपात्रातील पहिल्या टप्प्यात शिल्लक असलेला गाळ काढण्याचे काम वेगात सुरू राहावे, यासाठी नियोजन करण्यात आले.

वाशिष्ठी व शिव नदीपात्रातील टप्पा 1 व 2 मधील काढलेल्या गाळाचे निष्कासन करण्यासाठी चालू हंगामामध्ये टप्पा 2 मधील गाळ टाकण्याकरिता शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यांच्यासोबत 15 डिसेंबर रोजी झालेल्या सभेतील निर्णयानुसार नदीपात्रातील काढलेला गाळ खासगी जागेवर स्वखर्चाने वाहतूक करून नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्था, स्थानिक नागरिक यांच्या जागेत गाळ टाकण्याची मागणी आहे. मात्र, स्वखर्च परवडत नसल्याने वाहतूक होत नाही. बिगर व्यावसायिक प्रयोजनासाठी पूरबाधित क्षेत्राबाहेर खासगी मालकीच्या जागांवर संबंधित गाळाचा साठा करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या वाहनांद्वारे वाहतूक करण्यास परवानगी दिलेली आहे. हा गाळ बिगर व्यवसायासाठी मोफत देण्याबाबत नियोजन आहे. गाळ आवश्यक असणार्‍यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जागेची आवश्यक ती कागदपत्रे जोडून पूरबाधित क्षेत्राबाहेरील जागेत गाळाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत असून, तसे आवाहन प्रांताधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.

Back to top button