पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांमुळे दरवर्षी 25 दशलक्ष टन कचरा | पुढारी

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांमुळे दरवर्षी 25 दशलक्ष टन कचरा

न्यूयॉर्क : जगभरात बाटलीबंद पाण्याच्या विक्रीचा विक्रम रचला जात आहे. मात्र, तज्ज्ञ याला धोक्याची घंटा समजत आहेत. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटच्या अहवालामुळे पुन्हा एकदा प्लास्टिक कचर्‍याची चर्चा सुरू झाली आहे. जगभरात केवळ बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातून 270 अब्ज रुपयांची कमाई होत आहे, दरवर्षी 350 अब्ज लिटर पाणी खपत जात आहे.

नळाच्या पाण्याला बाटलीबंद पाणी हा पर्याय असल्याचे अहवालात म्हटले आहे. बाटलीबंद पाण्याच्या वाढत्या व्यवसायामुळे भूजलस्तर घटत असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाण्यासाठी नळावर अवलंबून असणारे कोट्यवधी लोक सध्या पाणी टंचाईशी संघर्ष करत आहेत. संशोधक झैनब यांच्या मते, सामान्य लोकांमध्ये असा समज आहे की बाटलीबंद पाणी हा सर्वात सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे, पण तसे नाही. ते नळाच्या पाण्यापेक्षा 150 पट जास्त पैसे मोजत आहेत. एवढेच नव्हे तर त्याचे धोकेही नमूद केले आहेत.

अहवालातील निष्कर्षानुसार, बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाबाबत कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेती व अन्य उद्योगासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हवामानातील बदलामुळे वर्षांनुवर्षे पावसाची पातळी आधीच कमी होत आहे.

आणखी एका अहवालानुसार, बाटली उद्योगामुळे 2021 मध्ये 600 अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर जमा झाले. यातून सुमारे 25 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला. त्रासदायक बाब म्हणजे यातील मोठ्या भागाचा पुनर्वापर होत नसल्याने ते जमिनीत जाऊन प्लास्टिक प्रदूषण वाढवत आहे. संशोधकांनी अशा प्रकारच्या प्लास्टिकला क्लायमेट किलर म्हटले आहे.

Back to top button