ED Action : छत्रपती संभाजीनगर मधील ४ बड्या कंत्राटदारांवर ईडीचे धाडसत्र | पुढारी

ED Action : छत्रपती संभाजीनगर मधील ४ बड्या कंत्राटदारांवर ईडीचे धाडसत्र

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या कथित निविदा घोटाळ्यातील कंत्राटदार कंपनीविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी (दि. 17) अमर बाफना, डॉ. सतिष रुणवाल आणि रितेश कांकरिया यांच्यासह संबंधित कंपनी भागीदारांच्या घर आणि कार्यालयावर धाडसत्र सुरु केले. पानदरीबा, अहिंसानगर, उल्कानगरी, समर्थनगर, नवाबपुरा, गारखेड्यात वेगवेगळ्या पथकाने छापे मारून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त केले. या कारवाईमुळे भ्रष्टाचारात हात असलेले अधिकारी, राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (ED Action)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी संध्याकाळीच विमानाने छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. ते क्रांती चौकाजवळील एका अलिशान हॉटेलात मुक्कामी राहिले. शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरची पासिंग असलेल्या वेगवेगळ्या सहा खासगी कारने कारवाईसाठी रवाना झाले. पानदरीबा, अहिंसानगर, उल्कानगरी, समर्थनगर येथे या पथकांनी एकाचवेळी छापेमारी करून खळबळ उडवून दिली. (ED Action)

या कंत्राटदारांवर धाडसत्र (ED Action)

समरथ कन्स्ट्रक्शनचा संचालक अमर अशोक बाफना याच्या पानदरीबा येथील घरी ईडीच्या पथकाने सकाळपासूनच झाडाझडती सुरु केली होती. तेथून मनी लॉड्रिंग आणि निविदा घोटाळ्या संबंधाने कागदपत्रे ईडीने जप्त केली. तसेच, बाफनाच्या गारखेड्यातील कार्यालयावरही ईडीच्या एका पथकाने झाडाझडती घेऊन कागदपत्र जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुंदर कन्स्ट्रक्शनचा मालक सतिष भागचंद रुणवाल (रा. प्लॉट क्र. 49, अहिंसानगर) याच्या घरात दोन अलिशान कारमधून आलेल्या ईडीच्या पथकाने सकाळी साडेसहा वाजता छापा मारला. तेथे जिन्सी पोलिसांनी तीन पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला होता. दरम्यान, दुसऱ्या एका पथकाने रुणवालच्या समर्थनगर येथील सुंदर कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयावर छापा मारून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली. एक पथक त्यांच्या रुग्णालयातही धडकल्याचे समजते.

इंडोग्लोबल इन्फ्रा. सर्विसेसचे भागीदार रितेश राजेंद्र कांकरिया (रा. फ्लॅट क्र. 301, मिता अपार्टमेंट, नवाबपुरा) हा फ्लॅट क्र. 1, पसायदान अपार्टमेंट, आदित्यनगर, उल्कानगरी येथे भाड्याने राहात असल्याचे समजल्यावर ईडीच्या तीन जणांच्या पथकाने छापा मारला. त्यांनी जवाहरनगर ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांना मदतीला घेतले होते. घरात पंचनामा करून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त केले. तसेच, हेच पथक रितेशच्या भावाला घेऊन नवाबपुऱ्यातील फ्लॅटमध्येही गेले होते. (ED Action)

नेमके प्रकरण काय?

केंद्र सरकारने 2016 ते 2022 दरम्यान शहरातील हक्काचे घर नसलेल्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरकूल प्रकल्पाची घोषणा केली होती. छत्रपती संभाजीनगरात 39 हजार घरे बांधण्यात येणार होती. या योजनेच्या निविदेतच घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाच्या उपायुक्त तथा प्रधानमंत्री आवास योजना विभाग प्रमुख अपर्णा थेटे यांच्या फिर्यादीवरून 23 फेब्रुवारीला सिटी चौक पोलिस ठाण्यात समरथ कन्स्ट्रक्शन अँड जे. व्ही., इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जॅग्वार ग्लोबल सर्विसेस या तीन कंत्राटदार कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात 19 आरोपींचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्यांनी एकाच आयपी अॅड्रेसवरून निविदा भरल्या आणि समरथ कन्स्ट्रक्शन अँड जे. व्ही. या कंपनीने कंत्राट मिळविले होते. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button