प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेची हेळसांड; जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार | पुढारी

प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेची हेळसांड; जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका गरीब महिलेची व तिच्या पतीची एका परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे हेळसांड झाली. याबाबत माजी नगरसेवक सतीश घाडगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक औंध, पुणे यांच्याकडे तक्रार करीत कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी 7.30 ते 8.30 वाजेच्या दरम्यान घडली.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार थोडक्यात हकीकत अशी की, देवसंस्थान स्वच्छता विभागात कर्मचारी म्हणून सेवेत असलेल्या मच्छिंद्र दोडके यांनी पत्नीला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तेथे परिचारिका गायकवाड यांनी त्यांना तपासले व प्रसूतीसाठी अजून किमान चार तास लागतील, असे सांगत थांबण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात पोटात खूपच दुखत असल्याने वारंवार दोडके हे परिचारिका गायकवाड यांना सांगत होते. मात्र, गायकवाड दुर्लक्ष करीत होत्या. अखेर वेदना असह्य होऊन दोडके यांची पत्नी खाली कोसळली व प्रसूती कक्षाच्या बाहेरील व्हरांड्यातच त्यांची प्रसूती झाली.

त्यानंतर परिचारिका गायकवाड, एक शिकाऊ डॉक्टर व इतर रुग्णांनी त्यांना बेडवर उचलून ठेवले. त्याहून गंभीर बाब म्हणजे फरशीवर सांडलेले रक्त दोडके यांनाच पुसायला लावले व बाहेरील औषधे आणायला सांगितले. या हलगर्जीपणामुळे प्रसूती झालेल्या रुग्णाचा रक्तस्राव थांबत नव्हता. परिस्थिती पाहून ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर सोनवणे यांनी 108 रुग्णवाहिकेतून रुग्णाला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले. रुग्णवाहिका चालकाने खूप मदत केली. हा प्रकार निंदनीय व गंभीर असून, सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सतीश घाडगे यांनी तक्रार अर्जात केली आहे.

प्रसूती कक्षातच महिला बाळंत : डॉ. सोनवणे
ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मनोहर सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता या महिलेची प्रसूती कक्षात झाली. या प्रसूतीवेळी रक्तस्राव जास्त झाल्याने पुढील उपचारांसाठी या महिलेला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याच दिवशी रुग्णालयात डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग अपुरा असतानाही 30 ते 35 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया आणि दोन प्रसूती करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल काही तक्रारी असतील, तर त्यामध्ये सुधारणा केल्या जातील, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

Back to top button