भारतीयांची विश्व भरारी! | पुढारी

भारतीयांची विश्व भरारी!

गेल्या काही वर्षांपासून जागतिक राजकारण-अर्थकारण-उद्योगव्यवस्थेच्या आसमंतात भारतीय वंशाच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांची यशोपताका दिमाखाने फडकत आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजयसिंह बंगा यांची निवड घोषित झाल्याने या शृंखलेत आणखी एक पुष्प जोडले गेले आहे. यानिमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच विश्व बँकेच्या सर्वोच्चपदी भारतीय व्यक्ती विराजमान होणार आहे.
प्रगत पाश्चिमात्य देश अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सापा-गारुड्यांचा देश म्हणून भारताला हिणवत असत; पण आज गुगल, मायक्रोसॉफ्टच्या प्रमुख पदांपासून ब्रिटन, आयर्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळापर्यंत सर्वदूर असणारा भारतीयांचा प्रभाव हा जगाला अचंबित करणारा ठरला आहे. ब्रिटिशांच्या वसाहतवादी, अन्यायी, जुलमी राजवटीतून मुक्त होत मिळवलेल्या स्वातंत्र्याचा विजयोत्सव साजरा करत भारताने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गारुड्यांचा देश म्हणून ब्रिटनसह पाश्चिमात्य जगातील भारताचा आणि भारतीयांचा नेहमीच हेटाळणी करत आले. भारतीय स्वातंत्र्याला संमती देतानाही इथे लोकशाही कशी टिकणार, अशी शंका स्वतःच्या गोरेपणाचा आणि पुढारलेपणाचा दुराभिमान बाळगणार्‍यांनी व्यक्त केली होती; परंतु आज साडेसात दशके अखंड लोकशाही व्यवस्था राबवून भारताने जगासमोर एक आदर्श घालून दिला. इतकेच नव्हे, तर भारत आज विभागीय महासत्ता म्हणून आशिया खंडात नावारुपाला आला आहे. जी-20 सारख्या जगातील बलाढ्य संघटनेचे अध्यक्षपद मिळवून भारताने आपल्या वैश्विक प्रभावाचे दर्शन घडवून दिले आहे. दुसरीकडे भारतीय वंशाच्या अनेक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तींचा आज जगभरात डंका आहे. आशिया, आफ्रिका, अमेरिका अशा सर्वच खंडांमध्ये कॉर्पोरेट विश्वापासून राज्यसत्तेपर्यंत महत्त्वाच्या स्थानांवर विराजमान होणारे भारतीय वंशाचे नागरिक भारताच्या वैभवशाली परंपरेचे शिरोमणी आहेत. ज्या भारतावर 150 वर्षे बि—टिशांनी राज्य केले, त्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक हेदेखील भारतीय वंशाचे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनात 130 हून अधिक भारतीय अमेरिकेच्या महत्त्वाच्या पदांवर आहेत. भारतीय वंशाचा समुदाय अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्का आहे; परंतु प्रशासनात त्यांचे प्रतिनिधित्व सर्वात मोठे आहे. भारतीय लोक ज्या-ज्या देशांत गेले तेथे त्यांनी त्या ठिकाणचे संविधान आणि संस्कृती आत्मसात करून त्या देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय व्यक्ती ज्या-ज्या देशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी आहेत, त्या प्रत्येक देशाला ही मंडळी आपल्या देशाची विविधता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा अभिमान वाटतो. समविचारी विचार करणारे आणि त्या देशाच्या भावनेचे प्रतिबिंब असलेल्या नेत्यांसह सरकार स्थापन करणार्‍या अशा भारतीयांबद्दल म्हणूनच जगभरात आत्मियता आणि आदर पाहायला मिळतो. आज टेक्नॉलॉजी विश्वातील दिग्गज कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत. विविध देशांमध्ये मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती खासदार, महापौर आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या हाती आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि माजी मास्टर कार्ड प्रमुख अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त भारतवर्षासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

तीन दशकांपूर्वीपर्यंत अजय बंगा हे कोलकाता येथील ‘नेस्ले’चे शाखा व्यवस्थापक होते. त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिका जागतिक बँकेवर हवामान बदलाच्या समस्या सोडविण्यासाठी पावले उचलण्यासाठी दबाव आणत असताना बायडेन यांनी ही निवड केली आहे, हे विशेष म्हणावे लागेल. अजय बंगा यांचे संपूर्ण शिक्षण भारतातच झाले आहे. येथून उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन आपली क्षमता सिद्ध केली. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण जालंधर आणि शिमला येथे झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. 1981 मध्ये त्यांनी नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून प्रवेश केला आणि तेथून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्यातील कौशल्यांनी आणि कर्तृत्वाने 13 वर्षांत बंगा हे या कंपनीत व्यवस्थापकपदापर्यंत पोहोचले. त्यानंतर पेप्सिकोच्या रेस्टॉरंट विभागात ते सहभागी झाले. केएफसी आणि पिझ्झा हट भारतात आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. 1996 मध्ये ते सिटीग्रुपचे मार्केटिंग हेड बनले. 2000 मध्ये सिटी फायनान्शियलचे प्रमुख म्हणून बंगा यांची नियुक्ती झाली. 2009 मध्ये ते मास्टरकार्डचे सीईओ बनले. फॉर्च्युन या जगप्रसिद्ध मासिकाने 2012 मध्ये अजय बंगा यांची जगातील शक्तिशाली उद्योगपती म्हणून निवड केली. व्यवसाय क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. अजय बंगा यांची एकूण संपत्ती 143 दशलक्ष आहे.

जागतिक बँकेने योग्य अजेंडा निवडून चांगल्या कामांवर भर द्यावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अजय बंगा यांना हवामान बदलासारख्या समस्या सोडविण्याची विशेष क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून संबोधले जात आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये भागीदारी निर्माण करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. अजय बंगा हे ‘जनरल अटलांटिक’ या खासगी इक्विटी फर्मचे उपाध्यक्ष आहेत. साडेतीन अब्ज बजेट असणार्‍या क्लायमेट चेंज फंडाच्या सल्लागार मंडळावरदेखील ते आहेत.
जागतिक बँकेचे प्रमुख बनणे ही अभिमानास्पद बाब असली, तरी हे पद तितकेच आव्हानांनी भरलेले आहे.

जागतिक बँकेचे मुख्य कार्य म्हणजे विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी कामे वाढवणे. सध्या कोरोना महामारीशी झुंज दिल्यानंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेक देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत. अशा स्थितीत जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून अजय बंगा यांच्यासमोर कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या आर्थिक गरजा संतुलित करण्याचे मोठे आव्हान असेल. अतिरिक्त आर्थिक संसाधनांशिवाय ते आव्हानांना कसे सामोरे जातात, हे पाहावे लागेल. अजय बंगा यांना अमेरिकन सरकारमध्ये काम करण्याचा भरपूर अनुभव आहे, यात शंका नाही. त्यांच्याकडे योग्य नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये राहण्याचा आणि काम करण्याचा अनुभव आणि कौशल्य त्यांच्यात आहे. बंगा यांनी यशस्वी जागतिक कंपन्या तयार करून आणि चालवून दाखवून आपल्यातील गुणवत्तेची प्रचिती जगाला दिली आहे.

– कमलेश गिरी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

Back to top button