जलपर्णीपासून तयार केली चक्क साडी! जमशेदपूरच्या अभियंत्याची कमाल | पुढारी

जलपर्णीपासून तयार केली चक्क साडी! जमशेदपूरच्या अभियंत्याची कमाल

दिनेश गुप्ता

पुणे : नदीपात्रात मोठा अडसर ठरणार्‍या जलपर्णी आता वरदान ठरणार आहेत. कारण यापासून धागा बनवून चक्क साड्या तयार करण्याचे तंत्रज्ञान जमशेदपूर येथील अभियंता गौरव आनंद यांनी विकसित केले आहे. जून 2023 पर्यंत जलपर्णीपासून तयार केलेल्या साड्या बाजारात येणार आहेत. पुणे शहरात नुकतीच हॉटेल हयात येथे आंतराष्ट्रीय पाणी परिषद झाली. जी-20 च्या धर्तीवर खास पाण्यावर यू-20 नावाची ही परिषद होती. यात देशविदेशातून आलेल्या तरुण अभियंत्यांनी केलेले संशोधन सादर केले.

त्यात जमशेदपूर येथून आलेल्या गौरव आनंद यांच्या सादरीकरणाने अवघ्या जगातून आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी नदीपात्रात आपोआप येऊन तिचा मार्ग अडवणार्‍या जलपर्णी (हायसिंथ) पासून चक्क साड्या तयार केल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की,संपूर्ण जगात नदीपात्रावर येणारी जलपर्णी हा डोकेदुखी ठरली आहे. त्यावर आम्ही जमशेदपूरमध्ये काम सुरू केले.

स्वच्छता पुकारे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नदीपात्र व तलावातून शेकडो विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या मदतीने जलपर्णी उपटून काढली. नेचर क्रफ्ट या समाजसेवी संस्थेच्या मदतीने विविध प्रयोग केले. यात विद्युत दिवे, भित्ती चित्रे, टाईल आर्टस, मॅटस, अशा वस्तू जलपर्णीपासून बनवल्या. त्यातून महिलांना रोजगार व उत्पनांचे स्रोत उभे राहिले. पुढे अधिक संशोधन केल्यावर जलपर्णीला वाळवून त्यापासून बारिक फायबर काढले त्याचे धाग्यात रुपांतर केले. हा प्रयोग यशस्वी झाला.

दोनशे महिला बनल्या प्रयोगाच्या अ‍ॅम्बेसेडॉर..
संस्थेच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये आम्ही एक प्रयोग केला. परगणा जिल्ह्यातील बोनगाव व मच्छलंदापूर या गावातील 30 तलावांतून जलपर्णी काढली. तेथील प्रसिध्द असलेल्या टॅन्ट साड्यांमध्ये कापसासाठी जो धागा वापरला जातो तो या जलपर्णीतून तयार करण्याचा प्रयोग राबवला गेला. पहिल्याच प्रयोगात यश मिळाल्याने बहुरंगी, बहुंढंगी साड्या तयार करण्यात यश मिळाले. या प्रयोगात तब्बल दोनशे महिलांचा सहभाग होता.

प्रयोग यशस्वी होताच जलपर्णीपासून सुरुवातीला 1 हजार साड्यात तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या जून-जुलैपर्यंत या तयार झालेल्या साड्या बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी सुरुवातील 20 लाखांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. महिलांना रोजगार म्हणून सुरुवातीला 4 ते 5 हजार रुपये मिळू शकतील.

                             – गौरव आनंद, संचालक, स्वच्छता पुकारे संस्था, जमशेदपूर

Back to top button