पुणे : चुकीच्या वनीकरणामुळे गवताळ ‘वनसृष्टी’ धोक्यात | पुढारी

पुणे : चुकीच्या वनीकरणामुळे गवताळ ‘वनसृष्टी’ धोक्यात

सुनील जगताप

पुणे : वनीकरणाच्या चुकीच्या कल्पनांमुळे गवताळ वनांमध्येही मोठी झाडे लावण्याच्या सपाट्यामुळे या गवताळ प्रदेशातच जगू शकणार्‍या वन्यजीवांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. अशा माळरानांचे संवर्धन आणि संरक्षण न झाल्यास गवताळ वनांमधील माळढोक, लांडगा, खोकड, चिंकारा यांसारख्या जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वने आणि जंगले म्हणजे मोठी झाडे तसेच अशा झाडांचे डवरलेले पट्टे म्हणजेच जंगल अशी चुकीची कल्पना सर्वसामान्य नागरिकांची तर असतेच, पण वनीकरणात काम करणार्‍या काही सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थाही त्याचाच कित्ता गिरवून चुकीच्या, घातक वनीकरणामागे लागल्याचे दिसून येत आहे. जंगलांच्या प्रकारांमध्ये जसे सदाहरित मोठ्या झाडांचा समावेश असलेल्या वनांचा समावेश असतो तसाच गवताळ वने, झुडपी वने यांचाही समावेश असतो.

या प्रत्येक वनांमध्ये त्या त्या वनांची स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण वन्यजीवसंपदा असते. त्यामुळे गवताळ वनांमध्ये राहणारे वन्यजीव मोठ्या झाडांच्या वनांमध्ये तग धरू शकत नाहीत, तर गवताळ वनांमध्ये राहणारे वन्यजीव मोठ्या झाडांच्या वनांमध्ये टिकू शकत नाहीत. याचे भान न ठेवता सरसकट वनीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे निरीक्षण अनेक निसर्ग अभ्यासकांनी नोंदवले आहे.

परिणामी, गवताळ वनांमधील वन्यजीवन धोक्यात आले आहे. माळरानांवरील जैववैविधता जंगलांएवढीच समृद्ध आहे. सर्वसामान्यांना दिसायला सगळेच गवताचे प्रकार सारखे वाटत असले, तरी त्यात विविधता असते. अनेक छोट्या वनस्पती या खडकाळ प्रदेशात तग धरून असतात. माळरानांवर मोठ्या शिकारी पक्ष्यांबरोबर लहान आकारातील वेगवेगळे पक्षी अवलंबून असतात.

काही पक्षी गवतांमध्येच घरटे करून अंडी उबवतात. लांडगा, खोकड, चिंकारा, भारतीय कोल्हा, काळवीट या वन्यप्राण्यांसह कीटक, फुलपाखरे, सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये विपुल वैभव बघायला मिळते. चिंकारा, काळवीट, लांडगे यासारख्या प्राण्यांचे सुरुवातीपासून संवर्धन आणि संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्यांची पूर्वीची स्थिती कळून येत नसली, तरी अलीकडच्या काळात पुरंदर, शिरूर आणि जुन्नर येथून लांडग्यांचा अधिवास पूर्ण संपुष्टात आला आहे. तर बारामती, इंदापूर या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात आढळतात.

वन्यजीव अभ्यासकांची नोंदवलेली निरीक्षणे
गवताळ प्रदेश, माळराने म्हणजे
पडीक जमिनी नाहीत
परिसंस्थेतील या प्रदेशांचे महत्त्व
अधोरेखित होण्याची गरज
बहुतांश माळराने वन विभाग,
महसूल आणि खासगी जागांमध्ये
माळरानांच्या संरक्षणासाठी एक
खिडकी समन्वय समितीची गरज
संकटग्रस्त माळरानांच्या
पुनरुज्जीवन आवश्यक
माळरानांच्या संवर्धनासाठी
दीर्घकालीन कृती आराखडा हवा

(सन 2022 मधील आकडेवारी)

 

Back to top button