शिवसैनिकांनी आगामी निवडणूकांसाठी सज्ज राहावे; चंद्रकांत खैरे | पुढारी

शिवसैनिकांनी आगामी निवडणूकांसाठी सज्ज राहावे; चंद्रकांत खैरे

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन णिवडणुकीसाठी सज्ज रहावे. असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.

गुरूवारी (दि. २) स्थानिक राजस्थानी भवन येथे ठाकरे गटाच्या पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थानावरून बोलत ते  होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना नेते शरद कोळी , युवासेना सचिव दुर्गा भोसले,  हर्षद काकडे, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे, संपर्क प्रमुख राजेन्द्र गायकवाड,  मोहन मोरे, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश मारावार, जिल्हा संघटक राजेश खामनेकर, उपजिल्हाप्रमुख अॅड बळीराम मुटकुळे, जिल्हा महिला संघटिका निर्मला विनकरे, विशाल पांडे आदिंची उपस्थिती होती.

माजी खासदार खैरे म्हणाले की, ज्या शिवसेनेने वाढवून मोठे केले त्या पक्षासोबत एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून उद्धव ठाकरे सारख्या प्रामाणिक नेतृत्वाला भाजपाच्या इडीच्या भितीने सत्तेपासुन खाली खेचले. अशा गद्दारांना बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक भिक घालणार नाही. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, यांना आपण वेळोवेळी सहकार्य केले पण त्यांनी खोक्या पायी गद्दारी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा, ‘गबरू’ असा उल्लेख करून त्यांचा व खासदार भावना गवळी यांचा खरपूस समाचार खैरे यांनी घेतला. न्यायालयात उद्धव ठाकरे यांची बाजू मजबुत असल्याने न्याय देवता योग्य न्याय करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या काळात भाजपाच्या कटकारस्थानाला न डगमगता आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी, प्राचार्य मोरे, शरद कोळी,  प्रविण गायकवाड यांचीही भाषणे झाली. या मेळाव्याला उमरखेड – महागाव विधान सभा क्षेत्रातील व पुसद तालुकातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने  हजर होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तालुका प्रमुख सतिश नाईक यांनी केले.

Back to top button