पिंपरी : नाना काटे यांना आणखी अठरा संघटनांचा पाठिंबा | पुढारी

पिंपरी : नाना काटे यांना आणखी अठरा संघटनांचा पाठिंबा

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या नाना काटे यांना सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी चाळीसहून अधिक संघटनांनी त्यांना पाठींबा दिला होता. मंगळवारी (दि.21) विविध 18 संघटनांनी त्यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येत आहे. महाविकास आघाडीचे नाना काटे आणि भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यात चुरस रंगली आहे. मात्र, भाजपने केंद्रातील 9 वर्षांच्या सत्ताकाळात तसेच, महापालिकेत असलेल्या 5 वर्षांच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराला भकास बनविले. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले. त्यातच खोक्याच्या जोरावर राज्यात घडविलेले सत्तापरिवर्तन सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक कार्य करणार्या संघटनांनाही ते रुचलेले नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजपची भ्रष्ट हुकुमशाही आणि राष्ट्रवादीने शहरात केलेला विकास या मुद्द्यावर लढली जात आहे. भाजपने राज्यघटना, संविधान अडचणीत आणल्यामुळे लोकशाहीला मानणार्या संघटना, सर्वसामान्यांसाठी काम करणारे अनेक पक्ष काटे यांच्या पाठिशी असलेल्या दिसत आहे.

या संघटनांचा पाठिंबा

पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी सोशल फाऊंडेशन, गंगाधर गाडे यांचा पॅथर्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय लहुजी पँथर (संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे), आखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, असंघटीत कष्टकरी कामगार महासंघ (महाराष्ट्र), युवराज पवार यांची पिंपरी-चिंचवड कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) (राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे), क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी समाज संघटना, कमला नेहरू विद्यालय, सम्राट अशोक सेना (विनोद चव्हाण), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष (शरद आप्पा म्हस्के), ख्रिश्चन फोरम (पास्टर राजेश केळकर), महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ (शहराध्यक्ष काशिनाथ तेलंगे-दाताळकर) यांच्यासह विविध संघटनांनी नाना काटे यांना पाठिंबा दिला आहे.

Back to top button