वेल्हे : ‘डोणगिरी’वरून सिंहगड 22 मिनिटांत सर | पुढारी

वेल्हे : ‘डोणगिरी’वरून सिंहगड 22 मिनिटांत सर

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : अतिदुर्गम डोणगिरी (तानाजी कडा) कड्यावरून किल्ले सिंहगड अवघ्या 22 मिनिटांत सर करून स्थानिक मावळा जवान संघटना व एस. एल. अ‍ॅव्हेंचरच्या मावळ्यांनी ‘हर हर महादेव, जय शिवराय’, ‘नरवीर तानाजी मालुसरे की जय’च्या जयघोषात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनोखी मानवंदना दिली. काळोख्या रात्री मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात दोरखंडाच्या साह्याने 500 फूट उंचीचा अतिबिकट डोणगिरी कडा सर करून सिंहगडाच्या माथ्यावर पोहोचताच मावळ्यांनी माथा टेकवला. अंगावर शहारे आणणार्‍या या क्षणाने सिंहगडावर शिवकाळ जागा झाला.

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन जगातील पहिल्या स्वातंत्र्याचा लढा अजरामर करणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तिथीनुसार 353 व्या बलिदानदिनानिमित्त स्थानिक मावळा जवान संघटना व एस. एल. अ‍ॅव्हेंचरच्या वतीने नरवीरांना मानवंदना देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गिर्यारोहक लव्हू उघडे, तुषार दिघे, कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण, शैलेश थोरवे, प्रसाद बागवे, मंगेश सांबरे, विनोद गायकवाड व युवराज घटकळ हे 9 मावळे बुधवारी (दि. 15) मध्यरात्री सिंहगडाच्या पश्चिमेकडील डोणगिरी कड्याखाली दाखल झाले.

रात्री साडेबारा वाजता कड्याच्या चढाईला सुरुवात केली. लहू उघडे व तुषार दिघे यांच्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जण दोरखंडाच्या साह्याने सरसर चढाई करीत अवघ्या 22 मिनिटांत गडावर पोहचले. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी कपाळाला मातीचा टिळा लावून ’हर हर महादेव, जय शिवराय’, ‘नरवीर तानाजी मालुसरे की जय’चा जयघोष केला आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली.

विक्रमी वेळेत कडा सर करून गडावर यशस्वी चढाई करणार्‍या या गिर्यारोहकांचा इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे जीवनचरित्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष रोहित नलावडे, अमोल पढेर, विश्वनाथ मुजुमले यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी या वेळी उपस्थित होते.

Back to top button