कोल्हापूर : रोजगार मेळाव्यातून तरुणांना नोकरीच्या संधी – प्रकाश आबिटकर | पुढारी

कोल्हापूर : रोजगार मेळाव्यातून तरुणांना नोकरीच्या संधी - प्रकाश आबिटकर

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील तरुण – तरुणींमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे अंगभूत गुण असून रोजगार मेळाव्यासारखे व्यासपीठ ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास त्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन आ. प्रकाश आबिटकर यांनी केले. गैबी तिट्टा ता. राधानगरी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी हे होते.

या वेळी ‘जेनिसिस’चे प्राचार्य डॉ. शोभराज माळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोजगार मेळाव्याचे संयोजक आणि गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी प्रास्ताविक भाषणात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होतकरू तरुण- तरुणींचे मनुष्यबळ उपलब्ध असून आ. आबिटकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच अशा भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन झाल्याचे सांगितले. तालुक्यात एमआयडीसी स्थापन व्हावी अशी आग्रही मागणी तायशेटे यांनी या वेळी केली. या मेळाव्यासाठी १८ कंपन्यांच्या माध्यमातून १५०० नोकऱ्या उपलब्ध केल्या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त माळी यांनी दिली.

या प्रसंगी न्यायाधीश पदी निवड झालेल्या तालुक्याच्या सुकन्या सौ. प्रगती वरुटे, परीवहन अधिकारी प्रतीक मोहिते, कर निरीक्षक नीता चंद्रकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, सुशांत माळवी, विकास माळवी, काजल कांबळे, आदींचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपसभापती अरुण जाधव, विजय बलुगडे, ॲड. शामराव भावके, अशोक वारके, अभिजीत पाटील, संग्राम पाटील, अमरेंद्र मिसाळ, राजू वाडेकर, सुभाष पाटील, राजू मोरे, संग्राम पताडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कुणाल मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले तर विश्वास पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का?

Back to top button