पुणे: पोलिस नष्ट करणार अमली पदार्थ, रांजणगावात 823 किलोंची होणार होळी | पुढारी

पुणे: पोलिस नष्ट करणार अमली पदार्थ, रांजणगावात 823 किलोंची होणार होळी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात विविध मार्गांतून 2022 मध्ये तस्करी झालेले पावणेचार कोटींचे तब्बल 823 किलो अमली पदार्थ रांजणगाव एमआयडीसीत नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

तस्करांकडून गांजा, चरस, मेफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एल.एस.डी. यासारख्या अमली पदार्थांची विक्री केली जाते. त्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थविरोधी पथकांनी 2022 मध्ये तब्बल 825 किलोवर ड्रग्ज जप्त केले होते. त्यामध्ये सर्वाधिक 818 किलो गांजाचा समावेश आहे. हेरॉईन 1 किलो 110 ग्रॅम, चरस 3 किलो 105 ग्रॅम, मेफेड्रॉन 113 ग्रॅम तर 252 ग्रॅम कोकेनचा समावेश आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 3 कोटी 75 लाखांवर आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार ड्रग डिस्पोजल कमिटीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांतर्गत वरिष्ठ निरीक्षकांच्या उपस्थितीत अमली पदार्थ जाळले जाणार आहेत. 2021 मध्ये पुणे पोलिसांनी मुंढव्यातील कारखान्यात 680 किलो ड्रग्जचा नाश केला होता.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी 2022 मध्ये सर्वाधिक 823 किलोवर ड्रग्ज जप्त केले आहेत. अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या पथकांकडून केली जाणार आहे.

Back to top button