मतभेद असु द्या, मनभेद नको – गडकरी; 96 व्‍या अ. भा. मराठी साहित्‍य संमेलनाचा समारोप | पुढारी

मतभेद असु द्या, मनभेद नको - गडकरी; 96 व्‍या अ. भा. मराठी साहित्‍य संमेलनाचा समारोप

वर्धा; पुढारी वृत्तसेवा: विद्वान लोक मोठ्या संख्येने एकत्र आले की वाद होतात. साहित्यिकांनी लोकहित,समाज हितासाठी आपले विचार परखडपणे मांडले पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी देखील ते खुल्या दिल्याने स्वीकारले पाहिजेत. मतभेद असू द्या मनभेद नको, जीवन विचाराच्या दृष्टीने इतरांच्या कल्याणाचा विचार करणारा देश व्हावा ही प्रेरणा साहित्यातून मिळते; असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 96 व्‍या अ. भा. मराठी साहित्‍य संमेलनादरम्यान केले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, जनरेशन गॅप लक्षात घेत साहित्य, कवितेत देखील बदलाची गरज आहे. लवकरच ज्ञानेशवरी, ग्रामगीता,गजानन विजय,गाडगेबाबा आदींचे संत साहित्य ,पोथी डिजिटल स्वरूपात तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यो साहित्य संमेलनादरम्यान दिली.

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, विनोबा, जमनालाल बजाज, सिंधूताई सपकाळ, पांडूरंगजी खानखोजे यांची ही पवित्र भूमी असून, या वर्धेच्‍या ऐतिहासिक भ‍ूमीवर साहित्‍य संमेलनाच्‍या निमित्‍ताने लोकांना विचारांचे अमृत मिळाले. हे विचार समाजाला नवी दिशा नक्‍की देतील, असे गौरवोद्गार गडकरी यांनी यावेळी काढले.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या 96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा आज रविवारी थाटात समारोप झाला. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरी येथील आचार्य विनोबा भावे सभामंडपात झालेल्या या समारोप कार्यक्रमाने अधिवेशनाचे सूप वाजले.

संमेलनाध्‍यक्ष न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्‍वागताध्‍यक्ष दत्ता मेघे, आ. पंकज भोयर, अ. भा. मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या अध्‍यक्ष उषा तांबे, विदर्भ साहित्‍य संघाचे कार्याध्‍यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, उज्‍ज्‍वला मेहेंदळे, सागर मेघे आदींची प्रामुख्याने उपस्‍थ‍िती होती. संत वाडमयाचे अभ्‍यासक ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्‍यक्ष राजीव बर्वे यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

नितीन गडकरी यांनी विदर्भ साहित्‍य संघाचे माजी अध्‍यक्ष स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. साहित्‍य, संस्‍कृतीतून समाज बदलत असतो, घडत असतो. भविष्‍यातील समाजाची दिशा ही साहित्‍यातून प्रतिबिंबित होत असते. म. रा. जोशी यांनी सत्‍काराला उत्‍तर देताना विदर्भ देशात प्रचंड साहित्‍य, शीलालेख, ताम्रपटातून आद्य मराठीचा शोध घेतला जाऊ शकतो, असेही गडकरी यांनी सांगितले. राजीव बर्वे यांनी मुलांसाठी प्रकाशित केलेली सचित्र पुस्‍तके शासनाने शाळांपर्यंत पोहोचवण्‍यासाठी अनुदान सुरू करावे, शासनाच्‍या निरूपयोगी जागा ग्रंथप्रदर्शनासाठी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात केली.

साहित्‍य संमेलनाच्‍या आयोजनात महत्‍वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिंचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. राहूल तेलरांधे यांनी नितीन गडकरी यांना तैलचित्र भेट दिले. संमेलनाचे अहवाल वाचन प्रदीप दाते यांनी केले तर ठराव वाचन उज्‍ज्‍वला मेहेंदळे यांनी केले. उषा तांबे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. 97 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या आयोजनासाठी इच्‍छूक असणा-या संस्‍थांनी 15 एप्रिल 2023 पर्यंत पत्र पाठवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. सीमा रोठे – शेटे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. गजानन नारे यांनी आभार मानले.

नव्‍या प्रतिभांचा हुंकार – न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, अरविंद जगताप, किशोर कदम ‘सौमित्र’ ही कलावंत मंडळी साहित्‍य संमेलनात आली. सेलिब्रिटी म्हणून लोकांनी गर्दी केली. नव्‍या प्रतिभेचे हुंकार साहित्‍य संमेलनात येत आहेत त्‍यांचे स्‍वागत केले पाहिजे. सरकारवर फार अवलंबून न राहता साहित्‍य संमेलने जितक्‍या कमी खर्चामध्‍ये करता येतील तेवढी ती केली पाहिजे. एकमेकांना भेटण्‍याची, विचारांचे आदानप्रदान करण्‍याची संधी त्‍यामुळे प्राप्‍त होते,साहित्‍याच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणूनच विद्रोही साहित्‍य संमेलनाला भेट दिली. सर्वांनी अशी उदारता शिकली पाहिजे. चांगली मासिके, नियतकालिक ही उदारता शिकवतात, असे ते म्‍हणाले.

Back to top button