क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पावणे चौदा लाखांची फसवणूक, टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणूक | पुढारी

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पावणे चौदा लाखांची फसवणूक, टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्रिप्टो या आभासी चलनाच्या ट्रेडिगमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने एकाला 1 हजार 600 जण सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून त्याच्याकडून तब्बल 13 लाख 76 हजार स्विकारून कोणताही नफा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात बिलग्रंट सिंग यांच्यासह वॉलेट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातून टेलीग्रामसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना क्रिप्टो करन्सीच्या आभासी चलनात गुंतवणुक करण्यास भाग पाडले जात असल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रविण नानासे रसाळ (30, रा. गुरू माऊली हाईट्स, नर्‍हे सिंहगडरोड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑनलाईन ऑक्टोबर 2022 मध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सिंग नावाच्या आरोपीने फिर्यादी रसाळ यांना रिलायंस फाउंडेशन या 1600 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. ग्रुपमधील सदस्यांनी संगणमताने क्रिप्टो ट्रेडिगमध्ये गुंतवणुक केल्यास खुप मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांना देखील क्रिप्टो ट्रेडिंग गुंतवणुक करून कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गुंतवणुक स्वरूपात 13 लाख 76 हजार रूपये किंमतीचे 2 लाख 60 हजार 758 ट्रॉन हे वॉलेट अ‍ॅड्रेसवर पाठविण्यास सांगितले. त्याने पैसे पाठवूनही त्यांना नफा न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button