पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित | पुढारी

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

पुणे, पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ’बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली छावणी परिसरातील मानेक शॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते.

डॉ.राजेश देशमुख म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला. सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो. भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

हेही वाचंलत का?

Back to top button