पुणे : पालिकेला मिळाले कोव्हिशिल्डचे 12 हजार डोस; बूस्टर घेणार्‍यांचे प्रमाण आणखी वाढणार | पुढारी

पुणे : पालिकेला मिळाले कोव्हिशिल्डचे 12 हजार डोस; बूस्टर घेणार्‍यांचे प्रमाण आणखी वाढणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरात कोव्हॅक्सिन लशीचा बूस्टर डोस घेणार्‍या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, कोव्हिशिल्ड उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना परत जावे लागत होते. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाला कोव्हिशिल्ड लशीचे 12 हजार डोस प्राप्त झाले, त्यामुळे शहरातील 21 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन लशीचे पहिले दोन डोस घेतले असल्यास तिसरा डोस कॉर्बेव्हॅक्सचा घेता येऊ शकतो. मात्र, महापालिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून कॉर्बेव्हॅक्स आणि कोव्हिशिल्ड लशीचे डोस उपलब्ध नव्हते. त्यामुळे केवळ कोव्हॅक्सिन लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांनाचा बूस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन उपलब्ध होत होती. आता कोव्हिशिल्डची लस उपलब्ध झाल्याने बूस्टर घेणार्‍या नागरिकांचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

महापालिकेच्या 21 शासकीय लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोव्हॅक्सिन लशीचे प्रत्येकी 100 डोस सर्व केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 15 ते 18 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ससून रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल, येरवडा कारागृह, मेंटल हॉस्पिटल, येरवडा आणि एनडीए खडकवासला या लसीकरण केंद्रांवर 100 कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाची सद्य:स्थिती

12 ते 14 वर्षे
पहिला डोस – 44,091
दुसरा डोस – 29,135

15 ते 18 वर्षे
पहिला डोस – 1,20,211
दुसरा डोस – 81,418

18 ते 45 वर्षे
पहिला डोस – 24,05,057
दुसरा डोस – 19,55,627
तिसरा डोस – 1,98,967

45 ते 60 वर्षे
पहिला डोस – 6,54,155
दुसरा डोस – 5,90,495
तिसरा डोस – 97,735

60 वर्षांवरील नागरिक
पहिला डोस –
38,86,208
दुसरा डोस –
32,68,536
तिसरा डोस – 5,45,401

12 ते 14 वयोगटांचे लसीकरण बंद
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कॉर्बेव्हॅक्स लशीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण बंद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड आणि कॉर्बेव्हॅक्स लशीचे डोस सशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Back to top button