Australia vs Taliban : अफगाणिस्‍तान विरुद्‍ध वनडे मालिका खेळण्‍यास ऑस्‍ट्रेलियाचा नकार, जाणून घ्‍या कारण… | पुढारी

Australia vs Taliban : अफगाणिस्‍तान विरुद्‍ध वनडे मालिका खेळण्‍यास ऑस्‍ट्रेलियाचा नकार, जाणून घ्‍या कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Australia vs Taliban : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये खेळवली जाणार होती. मात्र तालिबानच्या काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले असून मालिका खेळण्यास नकार दिला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार असून येथे उभय देशांदरम्यान चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौ-यानंतर कांगारूंचा संघ यूएईमध्ये जाऊन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अफगाणिस्तान विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. पण त्या आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत ही मालिका खेळण्यास आमचा संघ पाठवणार नसल्याचे जाहीर केले. (Australia vs Taliban)

ऑस्ट्रेलियाकडून तालिबानचा निषेध

महिला, मुलींच्या शिक्षण आणि रोजगारावर तालिबानने निर्बंध घातले आहेत. तालिबानच्या या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयसीसी सुपर लीगचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियन पुरुष संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सामना करणार होता परंतु गुरुवारच्या घोषणेनंतर ही मालिका पुढे ढकलली जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले क्रिकेट ऑस्ट्रेलिया?

तालिबानने अलीकडेच किशोरवयीन मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली असून महिलांना अफगाणिस्तानमधील विद्यापीठात जाण्यास मनाई केली आहे. या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संदर्भात एका निवेदन प्रसिद्ध केले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की, ‘मार्च 2023 मध्ये युएईत होणारी अफगाणिस्तान विरुद्धची तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नाही. तालिबानने त्यांच्या देशातील महिलांवर सुरू केलेल्या अत्याचारामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारसह भागधारकांशी विस्तृत चर्चा केल्यानंतरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे.’

‘तालिबानने महिला आणि मुलींच्या शिक्षणावर निर्बंध घातले. तसेच त्यांच्या रोजगाराच्या संधी आणि पार्क, जिममध्ये प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या या कृतीचा निषेश म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड अफगाणिस्तानसह जगभरातील महिला आणि पुरुषांच्या वाढत्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. महिला आणि मुलींच्या चांगल्या परिस्थितीच्या आशेने आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठिंबा देत राहू. या प्रकरणी ऑस्ट्रेलियन सरकारच्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,’ असेही बोर्डाने म्हटले आहे. (Australia vs Taliban)

आयसीसी सुपर लीगमध्ये ऑस्ट्रेलिया सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. यापैकी अव्वल आठ संघ या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरतील. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून, तेथील अनेक महिला खेळाडूंना लपून रहावे लागत आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

1996 ते 2001 पर्यंत तालिबानच्या दमनकारी राजवटीत महिलांना कोणताही खेळ खेळण्यास किंवा शिक्षण घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सार्वजनिक फाशीच्या शिक्षेसाठी क्रीडा मैदानांचा नियमित वापर केला जात असे. ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार होता, परंतु तालिबानच्या हल्ल्यानंतर सामना पुढे ढकलण्यात आला.

Back to top button