उत्तर भारतात थंडीचा कहर; राज्यात गोंदिया सर्वांत नीचांकी | पुढारी

उत्तर भारतात थंडीचा कहर; राज्यात गोंदिया सर्वांत नीचांकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील सर्वच राज्यांमध्ये थंडीचा कहर आहे. त्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असून, दाट धुक्यामुळे वाहनांची धडक होऊन अपघात होत आहेत. याउलट राज्यात मात्र विदर्भात पाऊस, धुके पडत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी धुके, ढगाळ वातावरण, दुपारी उकाडा आणि रात्री उशिरा थंडी, असे चित्र राज्यभरात आहे. राज्यात शनिवारी विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे किमान तापमान 6 अंश सेल्सिअस एवढे खाली आले आहे. ते राज्यात सर्वात नीचांकी ठरले आहे.

हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची स्थिती तीव्र झाली आहे. परिणामी, उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीचा कडाका आणि दाट धुके वाढले आहे. मात्र, या भागाकडून राज्यांकडे येणार्‍या थंड वार्‍यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळेच विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. अजून दोन दिवस या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे; तर उर्वरित भागांत ढगाळ वातावरण राहिले आहे.

पहिल्या पश्चिमी चक्रवाताची तीव्रता कमी होत नाही तोच दुसरा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. याशिवाय हवेच्या कमी दाब क्षेत्राचे थंडीवर आक्रमण होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. महाराष्ट्रातही सध्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.

शिवाय, ढगाळ वातावरण जाणवत नसले, तरी अधिक उंचीपर्यंत ढगाळसद़ृश धुक्याचे मळभ आच्छादित असते. त्यामुळे रात्रीतून जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दीर्घलहरी उष्णता-ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नसल्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घसरण होत नाही. दिवसाही अशा वातावरणामुळे लघुलहरी उष्णता-ऊर्जा जमीन तापवत नाही, त्यामुळे हवेचा थरही शुष्क केला जात नाही आणि त्यामुळे थंडी जाणवत नाही.

उत्तर भारतात पाठशिवणीच्या खेळाप्रमाणे एकापाठोपाठ लगेच पाठलाग करणार्‍या दोन पश्चिमी झंजावातात पुरेसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे थंडीचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही.
                                                             – माणिकराव खुळे,
                                                           निवृत्त हवामान शास्त्रज्ञ

Back to top button