बेळगाव : क्रिकेट खेळून घरी परतणाऱ्या दोघा मित्रांचा खून, शिंदोळी येथील घटना | पुढारी

बेळगाव : क्रिकेट खेळून घरी परतणाऱ्या दोघा मित्रांचा खून, शिंदोळी येथील घटना

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट खेळून घरी परतणाऱ्या दोघा तरुणांचा अज्ञात जमावाकडून खून झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथे रविवारी रात्री घडली. बसवराज मारुती बेळगावकर (वय 24) व गिरीश यल्लाप्पा नागन्नवर (वय 24 दोघेही रा. शिंदोळी) अशी मृतांची नावे आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, गावात सध्या हाफपीच क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. संबंधीत दोघे तरूण क्रिकेट खेळून रात्री उशिरा घरी परतत होते. यावेळी काही अनोळखी तरुणांनी येऊन त्यांच्यावर खुनी हल्ला चढवला. बसवराज हा जागीच ठार झाला, तर गिरीश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्‍याचा मृत्यू झाला.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी मारीहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या आठवडाभरापासून शिंदोळी येथे दिवस-रात्र हाफपीच क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यावेळी निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडली आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button