विमानतळावर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग; महापालिकेकडून उपाययोजना | पुढारी

विमानतळावर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग; महापालिकेकडून उपाययोजना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे महापालिकेने विमानतळावर आरोग्य विभागाचे एक पथक तैनात केले आहे. या पथकाकडून परदेशातून येणार्‍या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका अधिकार्‍यांची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना व यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे विमानतळावर एका पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाकडून परदेशातून येणार्‍या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. गरज भासल्यास आयसोलेशनचीही तयारी केल्याचे बिनवडे यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेकडे औषधांचा साठा पुरेसा आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला, तर सगळ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे राहील. सर्दी, खोकला, ताप असेल, तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लसीकरणमध्ये पुणे शहर अग्रेसर आहे. शहरात 99 टक्के लसीकरण झाले आहे. बूस्टर डोसबद्दलदेखील आपल्याकडे भरपूर साठा असल्याचे बिनवडे यांनी सांगितले.

Back to top button