नगर : कारभारी कोण? फैसला ‘ईव्हीएम’ मध्ये कैद | पुढारी

नगर : कारभारी कोण? फैसला ‘ईव्हीएम’ मध्ये कैद

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात 26 गावांसाठी झालेल्या मतदानात 45 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र मतदान शांततेत झाले असून, 26 गावांचे गाव कारभारींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. प्रत्येक गावात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीकडे बारकाईने लक्ष दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली पाहयला मिळाली. नगर तालुक्यात 26 गावांसाठी सरासरी 85 टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. महिलांमध्ये प्रथमच उत्साह दिसून आला.

नगर तालुक्यातील 27 पैकी26 गावांमध्ये मतदान झाले. पिंपळगाव लांडगा गावाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह होता. अनेक केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी साडे अकरापर्यंत तालुक्यात 32 टक्के मतदान झाले होते. नेप्ती, बाबुर्डी बेंद, आठवड, वाळकी, उक्कडगाव येथे दुपारच्या आत 50 टक्के मतदान झाले. वाळकी येथे मतदानासाठी मोठ्या रांगा होत्या. मतदानामुळे गावातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची दिवसभर कोंडी झाली. वाळकी सारोळा कासार येथे महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सायंकाळी चारपर्यंत तालुक्यात 73 टक्के मतदान झाले. शहरात व जिल्हा बाहेरील मतदारांनीही रविवार, सुटीचा दिवस असल्याने गावात येऊन मतदानाचा हक्क बजावला.

तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी मतदानाचे नियोजन केले. सर्वच गावांनी 80 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले. सर्वात जास्त मतदान बाबुर्डी बेंद गावी 94 टक्के झाले. सरपंच जनतेतून असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.

गरमलच्या लढतीकडे लक्ष
पांगरमल गावामध्ये गेल्या दहा वर्षांपासून बापूसाहेब आव्हाड सरपंच होते. त्यांच्या विरोधात यावेळेस पंचायत समितीचे माजी सभापती भरत आव्हाड यांचे चिरंजीव अमोल आव्हाड यांच्यात सरपंचपदासाठी सरळ-सरळ लढत होती. पांगरमल गावातील या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Back to top button