पुणे : अपस्मारवर थर्ड जनरेशन औषधे उपलब्ध | पुढारी

पुणे : अपस्मारवर थर्ड जनरेशन औषधे उपलब्ध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अपस्मार अर्थात इपिलेप्सी या आजारामध्ये रुग्णांना अचानक झटका किंवा फिट येण्याची शक्यता असते. मेंदुरोगतज्ज्ञांकडून अपस्माराचे निदान करून घेणे आवश्यक असते. बहुतांश वेळा अपस्मार औषधांनी बरा होतो. आता अपस्मारावर थर्ड जनरेशन औषधेही उपलब्ध आहेत. अपस्माराचे वेळीच निदान झाल्यास औषधोपचार लवकर सुरू करता येतात.

एका औषधाचा डोस डॉक्टरांकडून सुरू केला जातो आणि त्याची उपयुक्तता तपासली जाते. एका औषधाने फरक न पडल्यास दुसर्‍या औषधांचा डोस सुरू केला जातो. दोन्ही औषधांनी फरक न पडल्यास शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला जातो. मात्र, खूप कमी रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार आहे. जन्मत: मेंदूमध्ये असणारा दोष, अपघातामुळे डोक्याला झालेली इजा अशा कारणांमुळे अपस्माराची समस्या उद्भवू शकते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, पार्श्वभूमी, लक्षणे, ईईजी, एमआरआय, सीटी स्कॅन अशा चाचण्यांमधून अपस्माराचे निदान केले जाते.

सुरुवातीला अपस्माराच्या रुग्णांना औषधांचे डोस सुरू केले जातात. एका औषधाने फरक न पडल्यास दुसरे औषध सुरू केले जाते. आता अपस्मारावर थर्ड जनरेशन औषधेही उपलब्ध आहेत. अपस्मार लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत कोणत्याही वयोगटामध्ये दिसून येऊ शकतो. रुग्णाला फिट आल्यास तोंडात चमचा घालणे, कांदा वापरणे याऐवजी त्याला एका कुशीवर झोपवावे आणि मोकळा श्वास घेऊ द्यावा.

                                           – डॉ. प्रवीण नेफाडे,
असोसिएट प्रोफेसर, न्यूरॉलॉजी विभाग, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय,         रुग्णालय आणि संशोधन

Back to top button