जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष | पुढारी

जंजिरा किल्ल्याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान – आचार्य : इतिहासाची गाथा सांगणारा, समुद्राशी सतत हितगुज करणारा अभेद्य असा मुरुड जंजिरा किल्ला आता केवळ एक भग्न अवशेष उरला असल्याचे निदर्शनास येत आहे. किल्ल्यात वाढलेली झाडी, पडझड झालेला राणीचा महाल, दुकाने आणि घरे यामुळे हा किल्ला भकास वाटू लागला आहे, अशी तक्रार पर्यटक करत आहेत.

किल्ल्यावर इतिहासाची माहिती लिहलेली एकही पाटी नाही. त्यामुळे नेमक या किल्ल्याचे वैशिष्ट्य काय? असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. जीवघेणा प्रवास करून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर पुरातत्व खात्याकडून २५ रूपये मात्र नेटाने वसूल केले जातात. पण किल्ल्याची अवस्था पाहिल्या नंतर पुरातत्व खाते नेमके कशाचे २५ रुपये घेते असा प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांना पडला आहे.

मुरुड जंजिरा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. तरी देखील हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. त्यानंतर संभाजी राजेंनी हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कालांतराने भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा किल्ला सरकारच्या अखत्यारीत आला. हा संपूर्ण किल्ला २२ एकर जमिनीत बांधला असून या किल्ल्याच्या बांधकामाला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या किल्ल्याला एकूण १९ बुरुज आहेत. मात्र, सध्या या किल्ल्याची अवस्था अत्यंत बिकट असून हा किल्ला म्हणजे आता फक्त भगदाड उरले आहे. तटाच्या सर्वच बाजूंनी प्रचंड झाडी वाढली असून कोणतीही स्वच्छता या किल्ल्यावर नाही. इतकेच नव्हे किल्ल्यामध्ये असलेल्या तलावात प्लास्टिक च्या बाटल्या, पिशव्या पडलेल्या पाहायला मिळत असून इतिहासाच्या जाणकारांकडून किल्ल्याच्या अवस्थेबद्दल खेद व्यक्त केला जात आहे.

किल्ल्यात दोन शौचालय उभारण्यात आली होती. मात्र त्या शौचालयात पाणी येत नसल्याचे सांगत त्यांना कुलूप लावून ठेवले आहे. या पाण्यासाठी जनरेटरची सोय देखील करण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र ते काम देखील अद्यापही पूर्ण केले नाही. ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या देखील चार वर्षांपूर्वी काढण्यात आल्या. नवीन पाट्या लावण्यासाठी हा घाट घातला होता. अद्यापही नवीन पाट्या तेथे लावल्या गेल्या नाहीत. किल्ल्यावर काही तोफा ठेवल्या आहेत. त्या तोफांना नावे असुन त्यांचा इतिहास आहे. मात्र या तोफांची नावे काय असा प्रश्न येणाऱ्या पर्यटकांना पडला आहे.

किल्ल्याची स्वच्छता करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून झाडे देखील छाटणार आहोत.

– बजरंग अलिकार, पुरातत्व खाते अधिकारी

Back to top button