पुणे : तळजाईवर चक्क दिवाळी फराळ कार्यक्रम! वनविहारात तब्बल 40 वाहने | पुढारी

पुणे : तळजाईवर चक्क दिवाळी फराळ कार्यक्रम! वनविहारात तब्बल 40 वाहने

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तळजाई वन उद्यानामध्ये अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी येत असतात. तळजाईवर असलेल्या वन विहारामध्ये पायी चालणार्‍या नागरिकांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु, चक्क वन विहारामध्ये दिवाळी फराळाचा कार्यक्रम रंगला होता अन् या कार्यक्रमाचा थांगपत्ता वन विभागाला नसल्याचे समोर आले आहे.

वन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र, दुसर्‍या बाजूला लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वन उद्यानाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. पर्यायाने तळजाईवरील वनसंपदा धोक्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत तळजाईवर व्यायामासाठी येणारे राजू गोरे म्हणाले की, तळजाईवर आम्ही रोज व्यायामासाठी तसेच चालण्यासाठी येत असतो. रविवारी सकाळपासूनच वन विहारामध्ये दिवाळी फराळाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी तब्बल 35 ते 40 वाहने आतमध्ये आली असून त्यांना कोणी परवानगी दिली याबाबत शंका आहे. अशा प्रकारे वाहनांचा शिरकाव तळजाईच्या वनसंपदेला धोकादायक आहे.

तळजाईवरील वन विहारामध्ये दिवाळी फराळाचा कार्यक्रम झाला असल्याची माहिती समोर आलेली नाही. त्याबाबत कर्मचार्‍यांकडे चौकशी केली आहे. त्याचबरोबर 35 ते 40 वाहने ही नव्हती. त्याठिकाणी दोन ते तीन वाहने वन विहारामध्ये आलेली असून तीही वन विभागाच्या कर्मचार्‍यांचीच आहे. त्यामुळे अशा प्रकारचा दिवाळी फराळ कार्यक्रम झालेला नाही.
                                                         – राहुल पाटील, उपवनसंरक्षक,
                                                                    वन विभाग पुणे

Back to top button