काही आमदार, खासदार आमच्या संपर्कात : खासदार श्रीकांत शिंदे | पुढारी

काही आमदार, खासदार आमच्या संपर्कात : खासदार श्रीकांत शिंदे

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. मध्यावधी निवडणुकांचे वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

खासदार शिंदे हे डोंबिवलीच्या काटई गावात तुळशी विवाह सोहळ्यासाठी आले होते. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. याबाबत खासदार श्रीकांत शिंदेंना विचारले असता, महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. तसंच हे सरकार गेल्या ३ महिन्यात ज्या पद्धतीने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, ते पाहता २ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत काय परिस्थिती होईल? याचा विचार करून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीचं भूत समोर आणलं जात असल्याची टीका शिंदेंनी केली.

काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमचा आकडा किती वाढतो, हे येणाऱ्या काळात कळेलच, सगळ्यांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी  म्हटले आहे.

Back to top button