खानापूर : हत्तरवाड गावात ‘एक गाव एक तुलसी विवाह’ ची वैभवशाली परंपरा | पुढारी

खानापूर : हत्तरवाड गावात 'एक गाव एक तुलसी विवाह' ची वैभवशाली परंपरा

खानापूर ; वासुदेव चौगुले अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा असलेला हत्तरवाड (ता. खानापूर) येथील एक गाव एक तुलसी विवाह सोहळा सामाजिक सलोखा, बंधुत्व आणि एकतेचे प्रतीक आहे. हजारो भाविकांची उपस्थिती आणि दीपोत्सवामुळे या गावात दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी अवतरल्याचा प्रत्यय तुलसी विवाह निमित्त पाहायला मिळतो. यंदा सोमवार दि. 7 रोजी तालुक्यात प्रसिद्ध असलेला हा अनोखा तुलसी विवाह साजरा होणार असून, ग्रामस्थ आणि पंचमंडळींकडून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

तुलसी वृंदावनाशिवाय घराची संकल्पना पूर्णत्वाला येत नाही. पण हत्तरवाड गावात एकाही घरासमोर तुलसी वृंदावन नाही आणि तुलसीही नाही. कारण गावाच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तुलसीलाच प्रत्येक कुटुंब आपली मानून तिची पूजा करते. या गावाने अनेक दशकांपासून एक गाव एक तुलसी विवाहची परंपरा जोपासली आहे. नवसाला पावणारी तुळस अशी परिसरात ख्याती असल्याने येथील तुलसी विवाहाला नंदगड, हलसी, हलगा, मेरडा या परिसरातील हजारो भाविक सहकुटुंब हजेरी लावतात.

गोवा, महाराष्ट्रात असलेल्या माहेरवाशीनी देखील तुलसी विवाहाला आवर्जून उपस्थित राहतात. अलीकडच्या काळात नवस फेडण्यासाठी पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेले परिसरातील उद्योजक आणि महिला मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने या तुलसी विवाहाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. गाव प्रमुख, ग्रामस्थ व पंच कमिटीच्या उपस्थितीत थाटामाटात तुलसीचा विवाह सोहळा पार पाडला जातो. विद्युत रोषणाई आणि दीपोत्सवाने संपूर्ण गाव उजळून निघतो.

हत्तरवाड गाव लहान असले तरी येथील 90 पेक्षा जास्त लोक भारतीय सैन्य दलात जवान आहेत. गावची राखणदारीन असलेल्या तुलसीमुळेच सीमेवर देश रक्षणाची सेवा कोणत्याही त्रासाविना पार पाडता येते अशी या जवानांची श्रद्धा आहे. त्यामुळे भव्य दिव्य ठरणाऱ्या या सोहळ्याचा खर्च उचलण्यात हे जवान पुढाकार घेतात. आवळा, चिंच, चिरमुरे हा पूर्वापर चालत आलेला प्रसाद दिला जातो. गावातील सर्व मंदिरात दीपालंकाराची पूजा केली जाते. नवी जोडपी सामूहिक पूजेत सहभाग घेऊन सूखी संसाराचे मागणे मागतात. तुलसी विवाहानंतर लक्ष्मी मंदिर, रामलिंग मंदिर, मारुती मंदिर, कमलेश्वर मंदिरात कार्तिकोत्सव साजरा केला जातो.

अलीकडच्या काळात हत्तरवाड तुलसी विवाहाची ख्याती वाढल्याने त्याशिवाय नवसाला पावणारी तुलसी अशी ओळख झाल्याने वर्षागणिक सुवासिनी आणि भाविकांची सोहळ्याला गर्दी वाढत आहे. या कार्यक्रमामुळे अनोख्या तुलसी विवाहाचे गाव अशी वेगळी ओळख हत्तरवाडला प्राप्त झाली आहे.
शशिकांत गावडा-पाटील
ग्रामस्थ, हत्तरवाड

गावात कुणीही नवे घर बांधले तरी घरासमोर तूळस मात्र बांधली जात नाही. गावच्या तुळशीलाच घरची तुळस मानून एक गाव एक तुळशीची प्रथा आजतागायत कायम जपली आहे. आधी चुन्याचा लेप लावलेली मातीची तुळस होती. पाच वर्षांपूर्वी तुळशीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. कदंब राज्याच्या काळापासून चालत आलेली ही प्रथा असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.
रामचंद्र गावडा-पाटील, ग्रामस्थ

Back to top button