पुणे : हॉटेल मॅनेजरचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून, पोलिसांनी 24 तासांच्या आत लावला गुन्ह्याचा छडा | पुढारी

पुणे : हॉटेल मॅनेजरचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून, पोलिसांनी 24 तासांच्या आत लावला गुन्ह्याचा छडा

पुणे /धायरी :  एकाच महिलेशी दोघांच्या प्रेमसंबंधातूनच गारवा हॉटेलच्या व्यवस्थापकाचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी 24 तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावत एका अल्पवयीन मुलासह चौघांना बेड्या ठोकत प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनाचा प्रकार उघड केला आहे. याप्रकरणी अनिकेत अरुण मोरे (25, रा. मुक्ताई व्हिला, बेनकरवस्ती, धायरी), धीरज शिवाजी सोनवणे (19, रा. गणेशनगर, कोथरूड), सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे (19, रा. वसंतनगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

भरत भगवान कदम (वय 24) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात भरत यांचे बंधू प्रकाश यांनी फिर्याद दिली होती. भरत शनिवारी रात्री हॉटेल बंद करून दुचाकीने घरी निघाल्यानंतर नर्हे येथील श्री कंट्रोल चौक रस्ता ते धायरेश्वर रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा खून केला होता. या प्रकरणाचा सिंहगड रोड पोलिस तपास करत होते.

हल्ल्याचे कारण होते अस्पष्ट
हल्ल्याचे कारण अस्पष्ट होते. तसेच भरतचे कोणाशी वाददेखील नव्हते. मात्र, सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. स्थानिक पोलिसांचे इंटिलिजन्स, तांत्रिक तपास व पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात खून अनिकेत मोरे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे समोर आले. त्यानुसार, या चौघांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सचिन कदम, दीपक कादमाने, आबा उत्तेकर, सुनील चिखले, अंमलदार संजय शिंदे, अमित बोडरे, अमेय रसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

…………म्हणूनच काढला काटा
हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले. अनिकेत मोरे याच्या मैत्रिणीने त्याच्याशी वाद झाल्यानंतर बोलणे बंद केले होते. ती भरत याच्याशी बोलत होती. त्याचा राग अनिकेतच्या मनात होता. त्यावरून काही महिन्यांपूर्वी भरत व अनिकेत यांच्यात वाद देखील झाला होता. त्यानंतर अनिकेतने भरत याचा काटा काढण्याचा कट रचला. अनिकेतने त्याचा मावस भाऊ धीरज व त्याच्या साथीदारांना भरतचा गेम करण्यास सांगितले.

रेकी करून खून
खून करण्यासाठी आरोपींनी भरतची रेकी केली होती. त्याच्या हॉटेलमधून सुटण्याच्या वेळा तसेच त्याला रस्त्यात गाठायचे निर्जनस्थळ त्यांनी निश्चित केले होते. तसेच अंधारात त्याला कोठे गाठायचे हे देखील त्यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी अंधारातील पॉइंट फिक्स केला. तसेच मारेकर्‍यांना भरत कोण आहे हे देखील प्रत्यक्ष दाखवले होते. तो हॉटेलमधून घरी निघाला असतानाच त्याला अंधारात गाठून आरोपींनी त्यांच्याकडील धारदार कोयत्यांनी त्याच्यावर वार करून निर्घृण खून केला.

Back to top button