‘माता सुरक्षा’साठी नगरला दोन कोटी! शासनाचा निर्णय; ग्रामीण व शहरी भागासाठी एक-एक कोटींचे नियोजन | पुढारी

‘माता सुरक्षा’साठी नगरला दोन कोटी! शासनाचा निर्णय; ग्रामीण व शहरी भागासाठी एक-एक कोटींचे नियोजन

नगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरिता, तसेच औषधांसाठी प्रतिजिल्हा दोन कोटी रुपये निधी देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठीही दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात नवरात्री उत्सवापासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानास सुरुवात झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग हे अभियान राबविले जात आहे. या अभियानास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेत राज्यातील अंदाजे 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू असणार आहे. लाभार्थ्यांना तपासणीसाठी शिबिराच्या ठिकाणी आणणे व घरी पोहचविणे यासाठी वाहतूक व्यवस्था केल्यास अभियान अधिक प्रभावीपणे राबविता येईल, हे लक्षात घेऊन वाहतुकीसाठी निधीची तरतूद करण्याचे ठरले.

त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्याची वेगळ्या निधीची तरतूद नसल्याने हा निधी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांना उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी वाहतूक आणि औषधांकरिता मिळून 1 कोटी आणि शहरी आणि महापालिका क्षेत्रासाठी 1 कोटी असे प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या मोहिमेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत 18 वर्षावरील महिला, नवविवाहीत महिला, गरोदर माता यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जास्तीत जास्त तज्ञ तपासणीसाठी उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 30 वर्षांवरील सर्व महिलांचे कर्करोग मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान, नाक, घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. सदर शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात येत आहे.

Back to top button