दोघांत ३१ वर्षांचे अंतर हे प्रेमसंबंध नव्हे; पोक्सो न्यायालयाचा निर्णय | पुढारी

दोघांत ३१ वर्षांचे अंतर हे प्रेमसंबंध नव्हे; पोक्सो न्यायालयाचा निर्णय

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांच्यात 31 वर्षाचे अंतर असताना त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत हे न पटणारे आहे. तसेच आरोपी हा अनुभवी आणि प्रौढ तर पीडिताही अल्पवयीन आहे. असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने फेसबूकवरील भेटीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 45 वर्षीय व्यावसायिकाला जामीन देण्यास नकार दिला.

मुंबई राहणार्‍या 14 वर्षीय पीडितेची 45 वर्षीय आरोपीशी फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने तिला एक फोनही भेट म्हणून दिला होता. त्याने आपले वय 25 वर्ष असल्याचे सांगितले होते. सुरुवातीला एका बागेत भेटल्यानंतर दर आठवड्याला ते एकत्र बाहरे फिरू लागले. जानेवारी 2019 साली पीडितेचे आई वडील घरी नसताना आरोपीने घरी येऊन पीडितेला लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली.

पीडितेच्या शेजार्‍यांनी पीडितेच्या कुटूंबियांना त्यांच्या अनुपस्थितीत एक व्यक्ती येऊन गेल्याची माहिती दिली. त्यावर आपला फेसबूक मित्र असल्याची थाप पीडितेने मारली. मुलीच्या स्वभावातील बदल, फोनवर असणे, अभ्यासातील दुर्लक्ष पालकांच्या लक्षात आले आणि त्याबाबत पीडितेला विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत वाच्यता न करण्याची धमकीही त्याने दिली होती. पालकांनी आरोपीविरोधात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून आरोपीला अटक केली.

त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर विशेष न्यायाधीश प्रिती कुमार (घुले) यांच्या समोर सुनावणी झाली. आरोपीने या मुली बरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याची बाब आरोपीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना तिच्या जबाबात विसंगती असल्याचा दावाही केला.

Back to top button