फुरसुंगी: शंभु महादेव मंदिरातील चोरी प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात | पुढारी

फुरसुंगी: शंभु महादेव मंदिरातील चोरी प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फुरसुंगी गावचे ग्रामदैवत असलेल्या शंभु महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडल्यानंतर काही तासांच्या आतच हडपसर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी व्यसनाची गरज भागविण्यासाठी ही चोरी केल्याचा व त्यातील काही रक्कम खर्च केल्याचा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणल्याने फुरसुंगी ग्रामस्थांनी हडपसर पोलिसांचा सत्कार केला.

शंभु महादेव मंदिराच्या गाभार्‍यात ठेवलेली दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेली होती. ही बातमी फुरसुंगी परिसरात हवेसारखी पसरली होती. या पार्श्वभूमीवर हडपसर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी तिघेजण मंदीरातील दानपेटी उचलून बाजुला घेऊन जात असताना दिसून आले. पथकाने सीसीटीव्हीद्वारे अल्पवयीन चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

अल्पवयीन चोरटे कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ आणि निखिल पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 22 हजार 500 रूपये जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे,पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, समीर पांडुळे, निखिल पवार, सुरज कुंभार यांच्या पथकाने केली.

रेकी करून केली होती चोरी

मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी अल्पवयीन चोरट्यांनी हडपसर गावठाण राम मंदिराजवळील दुचाकी चोरली होती. मंदीरात चोरी केल्यानंतर पुन्हा चोरी केलेली दुचाकी त्याच ठिकाणी पार्क केली. चोरी करण्यापुर्वी त्यांनी शंभु महादेव मंदिरामध्ये जाऊन सर्व परिसराचे फोटो काढून रेकी केली. रक्कम चोरल्यानंतर त्यातील रक्कम लोकसेवा हनुमान मंदिराजवळ असणाऱ्या गार्डनमधील कचरा पेटीत पोत्यात लपवून ठेवली होती.

टॅटू काढत असताना घेतले ताब्यात

सराईत गुन्हेगार राहुलसिंग भोंड याच्या फोटोचा टॅटू छातीवर/हातावर काढीत असताना तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Back to top button