राज ठाकरे, शिंदे, फडणवीस एकत्र आले तर तुम्हाला का वाईट वाटतंय?: अजित पवार | पुढारी

राज ठाकरे, शिंदे, फडणवीस एकत्र आले तर तुम्हाला का वाईट वाटतंय?: अजित पवार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. त्यात लगेच बातमी करायचे काय कारण? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला वाईट का वाटतेय? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तुम्हाला बातम्या मिळत नसल्याने कशाच्याही बातम्या करता. शिंदे, फडणवीस, ठाकरे भेटीबाबत काहीही चुकीचे नाही, असेही पवार म्हणाले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, अतिवृष्टीने बळीराजाचे जे नुकसान झाले आहे, त्याला तातडीने मदत झाली तरच त्याचा उपयोग होईल. 50 हजारांची मदत करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल सरकारचे आभार आहेत, पण मागणी करूनही जे निर्णय होत नाही, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. शंभर रुपयांत शिधा देण्याची योजना चांगली असली तरी त्यात लक्ष देण्याची गरज मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे. अजूनही राज्याच्या अनेक भागात हा शिधा पोहोचलेला नाही. कोणत्या कार्डधारकांना तो मिळणार हादेखील प्रश्न आहे. यात त्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन पवार यांनी केले.

पवार म्हणाले, ही योजना मध्यमवर्गीयांसाठी का नाही? ठराविक लोकांनाच ही योजना का दिली जाते, सरकारच्या वतीने सवलतीच्या दरात द्यायचे असेल तर गरीब आणि मध्यमवर्गीय दोघांनाही ती मदत मिळायला हवी. कोणतीही योजना राबविताना त्याचे व्यवस्थित नियोजन करावेच लागते, नाही तर योजनेचा बोजवारा उडतो. चारपैकी दोन किंवा तीन वस्तू देऊन चालणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित विभागाचे मंत्री जरी हे किट लोकांपर्यंत पोहोचले असे सांगत असले तरी ते अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेले नाही. उलट काही ठिकाणी या शिधाचा काळाबाजार सुरू असल्याचे काही पत्रकारांनीच मला सांगितले आहे.

त्यावर काही बोलू इच्छित नाही

राज्यात तपास करण्यासाठी यापुढे सीबीआयला राज्य शासनाच्या परवानगीची गरज नाही, यासंबंधी पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शिंदे सरकारने महाराष्ट्रात पूर्व परवानगीचा निर्णय रद्द केला, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या काळात सीबीआयला राज्य शासनाच्या परवानगीशिवाय तपासाला मनाई होती. सध्याच्या सरकारने ती उठवली आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. शेवटी सरकार चालवताना हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

न्याय व्यवस्थेपुढे काय बोलणार ?

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे गेली अनेक महिने अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळण्याची शक्यता होती, परंतु न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायव्यवस्थेपुढे आपण काय बोलणार, असेही पवार या वेळी म्हणाले.

Back to top button