पिंपरी: वीस दिवसांत 50 एमएलडी पाणी घरात, अतिरिक्त आयुक्त जांभळे यांचा दावा | पुढारी

पिंपरी: वीस दिवसांत 50 एमएलडी पाणी घरात, अतिरिक्त आयुक्त जांभळे यांचा दावा

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: आंद्रा धरण पाणी प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उपलब्ध झाले असून, चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामुग्रीवर त्याबाबत चाचणी घेतली जात आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 20 दिवसांत आजूबाजूच्या घरात येथील पाणी पोहोचणार आहे, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी बुधवारी (दि.19) व्यक्त केला आहे.

वाढत्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पवना धरण 100 टक्के भरलेले असतानाही शहराला गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी दिले जात आहे. काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल तक्रारी कायम आहे. यासंदर्भात ‘पुढारी’ने ‘तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी; स्मार्ट सिटीमध्ये अनेक भागांत तक्रारी कायम’ असे ठळक वृत्त सोमवारी (दि.17) प्रसिद्ध केले होते. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.

अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले की, आंद्रा व भामा आसखेड धरण पाणी प्रकल्प पूर्ण करून शहराला अतिरिक्त 267 एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी विशेष नियोजन केले आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त (क्रमांक 1) जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड व प्रकल्प सल्लागार यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाबाबत दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे. तर, आयुक्त महिन्यातून एकदा आढावा घेणार आहेत.

प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी एमआयडीसी, वन, ग्रामपंचायत, नगरपालिका, पाटबंधारे, शासकीय व खासगी जागांचा समावेश आहे. त्या जागा ताब्यात घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, राज्य शासनाकडील प्रलंबित मुद्दे सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्याने 100 एमएलडी

दरम्यान, येत्या 20 दिवसांत 50 एमएलडी पाणी घराघरांत पोहोचणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 100 एमएलडी पाणी पुरविले जाणार आहे. त्यामुळे या भागात अतिरिक्त झालेले पाणी शहरातील ज्या भागात पाणी कमी पडत आहे, त्या भागात पुरविले जाणार आहे. ते भाग निश्चित करण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button