पिंपरी: ‘ती’प्रेमीयुगुल ठरताहेत डोकेदुखी | पुढारी

पिंपरी: ‘ती’प्रेमीयुगुल ठरताहेत डोकेदुखी

संतोष शिंदे

पिंपरी : सामाजिक भान हरपलेल्या प्रेमीयुगुलांचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वर्दळीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारमध्ये प्रेमीयुगुल आक्षेपार्ह स्थितीत मिळून येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. प्रेमीयुगुलांचे वय पाहून पोलिस कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा समज देत सोडून देतात. त्यामुळे अशा प्रकारात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत सविस्त वृत्त असे की, वाकड- हिंजवडी रस्त्यावरील एका टपरीच्या बाजूस अल्पवयीन प्रेमीयुगुल चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे प्रेमीयुगुलांचे सार्वजनिक ठिकाणी असलेले असभ्य वर्तन, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ ने सामान्य नागरिकांशी बोलून माहिती घेतली असता, शहर परिसरात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले; तसेच सोसायट्यांच्या रस्त्यांवर कमी वर्दळीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारमध्येदेखील अश्लील प्रकार सुरू असल्याचे नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गस्तीवरील पोलिसांनादेखील अशा प्रकारच्या डान्सिंग कार सर्रास दिसून येतात; मात्र अनेक प्रकरणात मुले अल्पवयीन असल्याचे पाहून पोलिस सहानुभूतीपूर्वक विचार करून समज देऊन सोडून देतात; मात्र काही पोलिस जोडप्यांना कायदेशीर कारवाई करण्याची भीती दाखवतात. पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून घ्या, असे सांगून जोडप्यांकडून चिरीमिरी उकळतात. प्रकरण जागेवर मिटत असल्याने जोडप्यांना पोलिसांची भीती उरली नाही. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पालकांची कुचंबणा

शहर परिसरातील मोठी उद्याने, टेकड्या, मोकळी मैदाने आणि निर्जन स्थळांवरदेखील जोडपी प्रेमसागरात अखंड बुडाल्याचे पहावयास मिळतात. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचे भानदेखील जोडप्यांना राहात नाही. उद्यानांमध्ये खेळण्यासाठी आलेली लहान मुले अशा जोडप्यांकडे पाहून प्रश्न विचारू लागतात. अशा वेळी पालक तोंडातून शब्द न काढता तेथून निघून जात मुलांच्या प्रश्नातून सुटका करून घेतात. यातील विशेष बाब म्हणजे उद्यानांमध्ये असलेले सुरक्षारक्षकही त्यांना हटकत नाहीत. त्यामुळे पालक अशा उद्यानांमध्ये मुलांना घेऊन जाण्यास टाळत असल्याचे पाहावयास मिळते.

पालकांनो सजग व्हा..!

आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला गेल्यानंतर काय करते, ते कोणासोबत असतात, मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याबाबत पालकांकडे माहिती असणे आवश्यक आहे; तसेच मुलगा कार घेऊन जात असल्यास तो कोठे जात आहे, याबाबतदेखील पालकांनी विचारणे गरजेचे आहे. आपला मुलगा वाईट संगतीत आहे का, मुलाच्या कारमध्ये दारूचा वास तर येत नाही ना, याबाबत पालकांनी खात्री करावी. एकंदरीत पोलिसांवर सर्व जबाबदारी झटकून पालकांनी हात वर करण्यापेक्षा आपले कर्तव्य पार पाडल्यास चांगली पिढी घडवणे शक्य होईल.

पोलिसांची गस्त हवी

शहरातील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी पोलिसांची वर्दळ असते; मात्र कमी वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या वेळीदेखील मार्शलने गस्त घालणे आवश्यक आहे. रस्त्यालगत संशयितरित्या उभ्या असलेल्या वाहनांची कसून तपासणी करून काही गैरप्रकार आढळ्यास कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.

सोसायट्यांकडे जाणार्‍या रस्त्यांवर डार्क फिल्म असलेल्या कारमध्ये जोडपी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सोसायटीधारकांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता, तेथून निघून ते दुसरीकडे थांबतात. तसेच, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कारमध्ये दारू पीत असल्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. वाईन्स शॉपपासून काही अंतरावर अशा प्रकारच्या कार उभ्या असतात. पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
– सुदेश राजे, माजी अध्यक्ष, पिंपरी- चिंचवड को-ऑप हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

रस्त्याने जाणार्‍या तसेच निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या संशयित कारची पोलिस नियमितपणे तपासणी करीत असतात. याव्यतिरिक्त काही ठिकाणी कारमध्ये अश्लील चाळे करणे, दारू पिणे असे प्रकार होत असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी किंवा पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत अवगत करावे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल.
-अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button