MSP : गव्हासह इतर शेतमालाच्या एमएसपी दरात वाढ | पुढारी

MSP : गव्हासह इतर शेतमालाच्या एमएसपी दरात वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी MSP) वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 110 रुपयांनी वाढ करण्यात आली असून गव्हाचा एमएसपी दर 2015 रुपयांच्या तुलनेत आता 2125 रुपयांवर गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या बैठकीत रब्बी पिकांच्या वाढीव एमएसपीवर (MSP) शिक्कामोर्तब करण्यात आले. खरीप आणि रबी हंगामातील एकूण 23 पिकांसाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून एमएसपी निश्चित केली जाते. रबी हंगामातील बार्ली पिकाचा प्रति क्विंटलमागील एमएसपी दर 1635 रुपयांवरुन 1735 रुपयावर नेण्यात आला आहे. हरभरा पिकाचा एमएसपी दर 5230 रुपयांवरुन 5335 रुपयांवर तर मसूरचा एमएसपी दर 550 रुपयांच्या तुलनेत 6 हजार रुपयांवर नेण्यात आला आला आहे. मसूरच्या एमएसपी दरातील वाढ 500 रुपयांनी जास्त आहे.

मोहरीच्या किमान आधारभूत किंमतीत याआधीच्या 5050 रुपयांच्या तुलनेत 5450 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. करडईची किमान आधारभूत किंमत 5441 रुपयांच्या तुलनेत 5650 रुपयांवर गेली आहे. बार्ली, हरभरा आणि मोहरीच्या आधारभूत किंमतीत झालेली वाढ क्रमशः 100, 105 आणि 400 रुपये आहे तर करडईच्या आधारभूत किंमतीमधील वाढ 209 रुपये इतकी आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने गव्हासहित इतर रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये 9 टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही वाढ करण्यात आली असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button