“नव्या पुण्याच्या ‘शिल्पकारांनी’ केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय”; जयंत पाटलांची बोचरी टीका | पुढारी

"नव्या पुण्याच्या 'शिल्पकारांनी' केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय"; जयंत पाटलांची बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन: पुणे शहराला सोमवारी रात्री अचानक मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार यांच्यासह स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पावसामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडत असल्यामुळे लहान मुलांना साेबत घेऊन जाताना कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. या पावसाने रस्त्यांवर फक्त पाणी आणि पाणीच अशी अवस्था होती. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ गेले पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास रस्त्यावरून वाहत आहे, अशा कठोर शब्दात त्यांनी निशाणा साधला.

 

जागतिक पातळीवर महत्व असणाऱ्या पुणे शहरात असे चित्र निर्माण होणे, हे अतिशय दुर्दैवी आहे असेही जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुण्यात रस्त्यांच्या अक्षरशः नद्या बनलेल्या आहेत. गेल्या २४ तासांत नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मागील पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शहरात सोमवारी सकाळपासूच ढगाळ वातावरण होतो. दुपारी वातावरण मोकळे होऊन ऊन पडले. परंतु संध्याकाळी पुन्हा ढगांची गर्दी वाढली. रात्री ९;३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, हडपसर, सिंहगड रस्ता भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पुण्यासारखाच पाऊस पिंपरी चिंचवड परिसरातही सुरू होता.

Back to top button